Friday, March 13, 2026 10:55:46 PM

Parbhani Mayor Election: ठाकरेंची सरशी; परभणीत मुस्लिम चेहऱ्याला संधी देत भाजपला केलं चितपट

रणनीती आणि संख्याबळाच्या अचूक गणितामुळे हा विजय शक्य झाला असून मराठवाड्यातील राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

parbhani mayor election ठाकरेंची सरशी परभणीत मुस्लिम चेहऱ्याला संधी देत भाजपला केलं चितपट

परभणी: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या परभणी महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत अखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस आघाडीने बाजी मारली आहे. राजकारणात 'वेळ आणि काळ' ओळखून निर्णय घेणे किती महत्त्वाचे असते, याचे उत्तम उदाहरण परभणीत पाहायला मिळाले. शिवसेनेने राजकीय चातुर्य पणाला लावत सय्यद इक्बाल खाजा यांची महापौरपदी निवड करून एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या निवडणूक प्रक्रियेत खाजा यांची बिनविरोध निवड झाली.

या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शिवसेनेने अवलंबलेली 'सोशल' रणनीती. मुंबईसारख्या महानगरात जिथे शिवसेना सातत्याने 'मराठी माणसा'चा मुद्दा लावून धरते, तिथेच परभणीत मात्र पक्षाने स्थानिक राजकीय गणिते ओळखून 'मुस्लिम कार्ड' खेळले आहे. परभणी महापालिकेत निवडून आलेल्या एकूण नगरसेवकांपैकी 30 नगरसेवक हे मुस्लिम समाजाचे आहेत. विशेष म्हणजे, ठाकरे गटाच्या 25 नगरसेवकांपैकी 13 मुस्लिम तर 12 हिंदू नगरसेवक आहेत. ही आकडेवारी लक्षात घेऊनच आणि अल्पसंख्याक समाजाचा विश्वास संपादन करण्यासाठी पक्षाने मुस्लिम चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेतला.

ही निवड म्हणजे केवळ एक राजकीय तडजोड नसून, यामागे एक ऐतिहासिक संदर्भही दडलेला आहे. 1995 मध्ये राज्यात युतीचे सरकार असताना दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी साबिर भाई शेख यांना मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली होती. आज परभणीत सय्यद इक्बाल खाजा यांच्या निवडीने जुन्या शिवसैनिकांना त्या इतिहासाची पुनरावृत्ती झाल्याचा भास होत आहे. "जातीपातीपेक्षा निष्ठेला महत्त्व," हा संदेश यातून देण्याचा प्रयत्न स्थानिक नेतृत्वाने केल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा: Passport Rule Changes: पासपोर्ट नियमांत मोठे बदल; 15 फेब्रुवारीपासून प्रक्रिया होणार पूर्णपणे हायटेक अन् पेपरलेस

महापौरपदासाठी आवश्यक असलेल्या संख्याबळाची जुळवाजुळव करण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरली. सत्तास्थापनेसाठी 34 नगरसेवकांच्या पाठबळाची गरज होती. काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडे मिळून 37 नगरसेवकांचे भक्कम संख्याबळ होते. त्यातच 'दुधात साखर' म्हणून एका अपक्ष नगरसेवकाने आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) एका सदस्यानेही सेना-काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत झालेली खलबते आणि त्यानंतर नगरसेवकांच्या मताचा आदर करत खाजा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाने सत्तास्थापनेसाठी सुरुवातीला बरीच चाचपणी केली. मात्र, बेरजेचे राजकारण जुळत नसल्याचे लक्षात येताच भाजपने शहाणपणाची भूमिका घेत निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. संख्याबळ नसतानाही अट्टहास करण्यापेक्षा माघार घेणे भाजपने पसंत केले. त्यामुळे परभणी महापालिकेत भगवा फडकवण्याचा मार्ग मोकळा झाला, पण यावेळी तो भगवा एका सर्वसमावेशक विचारधारेसह फडकल्याचे चित्र आहे.

परभणीतील हा विजय आगामी काळात मराठवाड्यातील राजकारणाला नवी दिशा देणारा ठरू शकतो. स्थानिक परिस्थितीनुसार लवचिक भूमिका घेणे आणि सर्वधर्मीय लोकांना सोबत घेऊन चालणे, हेच यशाचे गमक असू शकते, हे परभणी पॅटर्नने अधोरेखित केले आहे. आता नवनिर्वाचित महापौर सय्यद इक्बाल खाजा हे शहराच्या विकासाचा गाडा कसा हाकतात, याकडे परभणीकरांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Russia WhatsApp Ban: रशियाच्या त्या निर्णयामुळे मेटासमोर मोठे आव्हान; पुतिन सरकारच्या निर्णयाने जागतिक टेक क्षेत्रात खळबळ


सम्बन्धित सामग्री