Saturday, December 13, 2025 01:26:04 PM

Pimpri Chinchwad Politics: पिंपरी - चिंचवड महानगरपालिका राजकारण नव्या वळणावर; या प्रभागांच्या आरक्षणात बदल

OBC महिला आरक्षणाचा नियम लागू न झाल्याने नवी सोडत जाहीर करण्यात आली असून 17 ते 24 नोव्हेंबरदरम्यान हरकती मागवण्यात आल्या आहेत.

pimpri chinchwad politics पिंपरी - चिंचवड महानगरपालिका राजकारण नव्या वळणावर या प्रभागांच्या आरक्षणात बदल

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीनंतर निवडणूक आयोगाने दोन प्रभागामध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. नागरिकांचा मागासवर्ग (OBC) महिला आरक्षणासंदर्भात नियमांनुसार अंमलबजावणी न झाल्याचे लक्षात आल्याने आयोगाने दुरुस्ती करून नवे आरक्षण जाहीर केले आहे. या निर्णयामुळे प्रभाग 19 आणि प्रभाग 30 मधील आरक्षणाचे संपूर्ण गणित बदलले आहे. 11 नोव्हेंबर 2025 रोजी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या सोडतीत प्रभागनिहाय आरक्षण निश्चित झाले होते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला आरक्षणामुळे काही ठिकाणी माजी नगरसेवकांचे आणि इच्छुक उमेदवारांचे समीकरणच बदलले. मात्र, नियमांतील एका तरतुदीचा योग्य वापर न झाल्याने आयोगाने सोडतीनंतर दुरुस्ती प्रक्रिया हाती घेतली. या दुरुस्तीचा थेट परिणाम दोन प्रभागांतील एकूण चार जागांवर झाला.

आयोगाच्या दुरुस्तीनुसार, प्रभाग 30 मध्ये सोडतीवेळी OBC प्रवर्गातील ‘क’ जागा सामान्य राखण्यात आली होती, परंतु नियमांनुसार ती महिलांसाठी राखीव होणे अपेक्षित होते. त्यामुळे आता ‘क’ जागा OBC महिलांसाठी राखीव करण्यात आली आहे. त्याच प्रभागातील ‘ड’ जागा आधी सर्वसाधारण महिलांसाठी ठेवण्यात आली होती, ती आता सर्वसाधारण खुल्या प्रवर्गात परत आली आहे. याचा परिणाम प्रभाग 19 वरही झाला. सोडतीत प्रभाग 19 मधील ‘ब’ जागा OBC महिलांसाठी राखीव होती, परंतु प्रभाग 30 मधील त्रुटी दुरुस्त झाल्यानंतर ती महिला आरक्षित जागा रद्द करण्यात आली. तसेच या बदलानंतर प्रभाग 19 मधील ‘क’ जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव करण्यात आली आहे.

हेही वाचा:  Mumbai CNG Crisis : रिक्षा, टॅक्सी, बससाठी मुंबईकरांची मोठी परेड! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत वाहतूकसेवा विस्कळीत

या दुरुस्तीनंतर अनेक इच्छुक उमेदवारांचे गणित बदलणार असून काही ठिकाणी उमेदवार बदलण्याची वेळ येऊ शकते. मात्र, संपूर्ण बदल हे आरक्षण सोडतीतील नियमांचे काटेकोर पालन करत करण्यात आल्याचे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे. नागरिकांना या नव्या आरक्षणाबाबत 17 ते 24 नोव्हेंबर 2025 या कालावधीत हरकत नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पवार यांनी दिली. नियमांनुसार, एखाद्या प्रभागात अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीसाठी एक किंवा अधिक जागा राखीव असतील, पण त्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण नसेल, तर त्या प्रभागातील OBC प्रवर्गातील एका जागेला महिला आरक्षण द्यावे लागते. ही तरतूद प्रभाग 30 मध्ये लागू झाली नसल्याने आयोगाने चूक दुरुस्त केली.

दुरुस्ती झाल्यानंतर प्रभागनिहाय आरक्षणात महत्त्वाचे बदल दिसून येतात. प्रभाग 19 (उद्योगनगर, विजयनगर, भाटनगर, पिंपरी कॅम्प) मध्ये आता ‘अ’ जागा अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव आहे, तर ‘ब’ जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आली आहे. या प्रभागातील ‘क’ जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव करण्यात आली असून ‘ड’ जागा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी ठेवण्यात आली आहे. दुसरीकडे, प्रभाग 30 (दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी) मध्ये ‘अ’ जागा अनुसूचित जातींसाठी तर ‘ब’ जागा अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव आहे. याच प्रभागातील ‘क’ जागा नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखून ठेवण्यात आली आहे, तर ‘ड’ जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुली करण्यात आली आहे. या बदलांमुळे दोन्ही प्रभागांतील आरक्षणाचे स्वरूप पूर्णपणे नव्याने निश्चित झाले आहे.

निवडणूक आयोगाच्या या बदलांमुळे पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचं चित्र अधिक रोचक झालं आहे. अनेक उमेदवारांना आता नव्या आरक्षणानुसार रणनीती ठरवावी लागणार असून पुढील काही दिवसांत उमेदवारी समीकरणात मोठी हालचाल दिसू शकते.

हेही वाचा: Fraud Case : इन्स्पेक्टर, बँक मॅनेजर कोणालाच नाही सोडलं...लग्न करून तिने कोट्यावधी रुपये उकळले, नेमकं घडलं काय?


सम्बन्धित सामग्री