नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील ठाकरे गटाच्या खासदारांची बंडखोरी आणि पश्चिम बंगालमधील सत्तांतर हे मुद्दे ऐरणीवर आले. ठाकरेंच्या सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर लगेचच विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीदेखील महायुतीतून विधानपरिषद उपसभापती पदाचा अर्झ दाखल करून ठाकरेंना धक्का दिला. दरम्यान, या सर्व खासदारांना 50-50 कोटी रुपये दिल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून शिंदे गटावर केला असून आता तामिळनाडूच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे.
तामिळनाडूमध्ये सी. जोसेफ विजय यांचे सरकार पाडण्याच्या उद्देशाने 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) च्या एका आमदाराला लाच देण्याचा आणि धमकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चेन्नईमध्ये किमान तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, TVK चे उथंगराई येथील आमदार एन. एलैयाराजा यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. तमिळनाडू विधानसभेत विधानसभा अध्यक्षांविरुद्ध प्रस्तावित असलेल्या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करण्यासाठी आपल्याला फोनवरून 35 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, असा आरोप त्यांनी केला होता. आपल्या तक्रारीत इलय्याराजा यांनी आरोप केला की, आरोपींपैकी एक असलेल्या तिरुनावुक्करसू याने स्वतःची ओळख एका राजकीय संघटनेशी संबंधित व्यक्ती अशी करून दिली. तसेच विधानसभेत सभापतींविरुद्ध लवकरच अविश्वास ठराव आणला जाईल, असा दावा केला.
टीव्हीके (TVK) आमदाराने आरोप केला आहे की, प्रस्तावित ठरावाच्या वेळी विशिष्ट पद्धतीने मतदान करण्यासाठी त्यांना 35 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. तक्रारीनुसार, त्यांनी ही ऑफर नाकारली असता, आरोपींनी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला हानी पोहोचवण्याची धमकी दिली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या व्यक्तींपैकी एक जण कथितरीत्या द्रमुक (DMK) नेते सेंथिल बालाजी यांच्याशी संबंधित आहे. या द्रमुक नेत्याचे बंधू व्ही. अशोक कुमार यांनी कथितरीत्या चेन्नईमध्ये आरोपी नरेश याची भेट घेतली होती.
या अटकेच्या पार्श्वभूमीवर, विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप टीव्हीकेने (TVK) केला आहे. राजकीय विरोधकांनी टीव्हीकेला सरकार स्थापन करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता आणि आता कथित 'हॉर्स-ट्रेडिंग'द्वारे (आमदारांची फोडाफोड करून) सरकार कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा पक्षाने एका निवेदनात केला आहे. टीव्हीकेने पुढे असा आरोप केला की, मध्यस्थांनी त्यांच्या एका आमदाराला कोट्यवधी रुपयांची ऑफर देण्याचा प्रयत्न केला होता. तसेच या अटकांमुळे सरकारविरुद्धच्या एका कटाचा पर्दाफाश झाला असल्याचेही त्यांनी म्हटले.
तमिळनाडूचे मंत्री सी.टी.आर. निर्मल कुमार यांनी डीएमकेवर (DMK) टीव्हीके (TVK) च्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. विधानसभा अध्यक्षांविरुद्धच्या अविश्वास ठरावासाठी पाठिंबा मिळवण्याच्या उद्देशाने, गेल्या 40 दिवसांपासून डीएमकेशी संबंधित नेत्यांनी टीव्हीकेच्या आमदारांशी संपर्क साधून त्यांना रोख रकमेची आमिषे दाखवली, असा दावा त्यांनी केला. "स्टॅलिन आणि उदयनिधी यांच्या आदेशानुसार, सेंथिल बालाजी यांनी 50 कोटी रुपयांपर्यंतची ऑफर देऊन आमच्या आमदारांशी संपर्क साधला आहे. गेल्या 40 दिवसांपासून ते आमच्या सदस्यांची फोडाफोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणाला किती पैसे द्यायचे आणि यात किती रकमेचा व्यवहार होणार, याबद्दल चर्चाही झाली आहे. स्टॅलिन आणि उदयनिधी अत्यंत घृणास्पद आणि नीच पद्धतीचा अवलंब करत आहेत," असे कुमार म्हणाले.