पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक वेगळाच आणि साधा अंदाज पाहायला मिळाला. झाडग्राम येथे आयोजित सभेला संबोधित केल्यानंतर चॉपरकडे जात असताना मोदी अचानक रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झालमुडीच्या दुकानाजवळ थांबले. सुरक्षारक्षकांच्या गराड्यातही त्यांनी थेट दुकानदाराशी संवाद साधत झालमुडी खाण्याची इच्छा व्यक्त केली. या अचानक भेटीमुळे उपस्थित नागरिक आणि लहान मुलांमध्ये उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.मोदी यांनी दुकानदाराला ‘भाई, हमें भी आपका झालमुड़ी खिलाओ’ असे म्हणत संवादाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी झालमुडीची किंमत विचारली. दुकानदाराने 5 रुपयांपासून ते 20 रुपयांपर्यंत विविध पर्याय असल्याचे सांगितले. यावर मोदी यांनी ‘जो अच्छा है, वही बना दो’ असे म्हणत 10 रुपयांची झालमुडी बनवण्यास सांगितले. विशेष म्हणजे त्यांनी स्वतःच्या खिशातून 10 रुपयांची नोट काढून दुकानदाराला दिली. सुरुवातीला दुकानदाराने पैसे घेण्यास नकार दिला, मात्र मोदी यांच्या आग्रहानंतर त्याने ते स्वीकारले.
या दरम्यान दुकानदाराने मोदींना विचारले की, ‘आप प्याज खाते हैं?’ यावर मोदी यांनी दिलेले उत्तर उपस्थितांना हसवून गेले. त्यांनी हसतच उत्तर दिले, ‘हां, प्याज खाते हैं… दिमाग नहीं खाते बस.’ या हलक्या-फुलक्या संवादामुळे वातावरणात एक वेगळाच रंग भरला. त्यानंतर मोदींनी तयार झालेली झालमुडी स्वतः खाल्ली आणि तिथे उपस्थित काही मुलांनाही वाटली. या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ स्वतः मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला असून तो सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. राजकीय भाषणांच्या गडबडीतून वेळ काढत त्यांनी दाखवलेला हा साधेपणा आणि लोकांशी जोडून घेण्याचा प्रयत्न अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. या घटनेमुळे निवडणूक प्रचारात एक वेगळाच मानवी स्पर्श पाहायला मिळाला.