Ravindra Chavan: महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने राज्यातील राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात नेतेमंडळी एकमेकांवर थेट हल्लाबोल करताना दिसत आहेत. भाषणांपुरतेच नव्हे, तर आता सोशल मीडियावरही आरोप-प्रत्यारोपांची फैरी झडू लागल्या आहेत. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यातील सोशल मीडिया वाद सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
या वादाची सुरुवात संजय राऊत यांच्या एका पोस्टमुळे झाली. त्यांनी त्यांच्या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) खात्यावर रवींद्र चव्हाण यांचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये चव्हाण हे लुंगी परिधान केलेल्या अवस्थेत दिसत असून, त्यांच्या शेजारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित आहेत. या फोटोचा आधार घेत राऊत यांनी भाजपावर टोलेबाजी केली. अमराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपाकडून वेगवेगळे प्रयोग केले जात असल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकाराला ‘रसमलाई इफेक्ट’ असे नाव दिले.
राऊतांनी केलेल्या टीकेनंतर राजकीय वर्तुळात लगेचच प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यांनी सूचक शब्दांत चव्हाणांच्या वेशभूषेवर सवाल उपस्थित करत, मराठी संस्कृतीचा मुद्दा उपस्थित केला. लुंगी परिधान करण्यामागे कारण सांगण्यात आले असले, तरी त्याऐवजी पारंपरिक मराठी पोशाख परिधान करता आला असता, असा टोला त्यांनी लगावला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अशा पोस्टमुळे वादाला अधिकच धार आली.
मात्र, या टीकेला रवींद्र चव्हाण यांनीही तितक्याच आक्रमक पद्धतीने उत्तर दिलं. त्यांनीही सोशल मीडियावर ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांचा एक फोटो शेअर करत प्रत्युत्तर दिलं. “जशास तसे” उत्तर देत चव्हाण यांनी राऊत आणि ठाकरे गटावर पलटवार केला. या पोस्टनंतर राजकीय चर्चांना वेगळंच वळण मिळालं असून, समर्थक आणि विरोधकांमध्ये सोशल मीडियावर जोरदार वाद रंगू लागला आहे.
हेही वाचा: Anish Gadhave : 'आम्ही भल्याभल्यांचे भोपळे फोडतो...'; ठाण्यातचं नरेश म्हस्केंना ठणकावलं, ठाकरेंच्या सभेत कार्यकर्ता संतापला
विशेष म्हणजे, निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात विकास, कामगिरी किंवा स्थानिक मुद्द्यांपेक्षा वैयक्तिक फोटो, जुने प्रसंग आणि प्रतीकात्मक गोष्टी चर्चेच्या केंद्रस्थानी आल्याचं पाहायला मिळत आहे. नेते एकमेकांना अडचणीत आणण्यासाठी कोणतीही संधी सोडत नसल्याचं चित्र आहे.
या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस अधिकच रंगतदार ठरत आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या या शाब्दिक युद्धामुळे मतदारांचं लक्ष वेधलं जात असलं, तरी शेवटी मतपेटीत कोणाला फायदा होणार, हे निकालाच्याच दिवशी स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत मात्र फोटो, टोले आणि प्रत्युत्तरांनी राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं दिसत आहे.