मुंबई: वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणात नाव समोर आल्यानंतर रडारवर आलेले जालिंदर सुपेकर यांच्या कारनाम्यांची मालिका काही थांबायचे नाव घेत नाही. कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचार घोटाळ्यात अडकलेल्या जालिंदर सुपेकर यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी थेट भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत.
समाजमाध्यमांतून मोठा गौप्यस्फोट करत राजू शेट्टींनी मोठा गौप्यस्फोट करत म्हटले की, 'सुपेकर आणि तत्कालीन पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी मिळून कैद्यांच्या दिवाळी फराळाच्या नावाखाली तब्बल 1 हजार 200 रुपये किलोची काजूकतली खरेदी केली होती. मात्र, ती कैद्यांना मिळाल्याचे कुठेही दिसून आले नाही. प्रत्यक्षात कैद्यांना स्थानिक बाजारातील स्वस्त फराळ पुरवण्यात आला आणि दरांमध्ये 40 ते 60 टक्क्यांची मोठी तफावत होती, असा आरोप त्यांनी केला.
राज्यातील विविध कारागृहांतील रेशन आणि कँटीन खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला असून, गेल्या दिवाळीत सुमारे ५ कोटी रुपयांची खरेदी केल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी नमूद केले. 'या खरेदीसाठी कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता थेट साहित्य खरेदी केला आहे', असा आरोप त्यांनी केला आहे. 'काजूकतली हल्दीराम, चितळे बंधू आणि काका हलवाई दराने खरेदी केल्याचे दाखवून स्थानिक फराळ देण्यात आला आहे. हे स्पष्ट भ्रष्टाचार आहे', असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
काय म्हणाले राजू शेट्टी?
राजू शेट्टी म्हणाले की, 'दिवाळी फराळ म्हणून कैद्यांना अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर यांनी 1200 रूपये किलोची काजूकतली खायला घातली होती. मात्र कैद्यांनी ती खाल्लीच नाही ……! राज्यातील कारागृहात कैद्यांच्या नावाखाली बड्या अधिका-यांनी रेशन आणि कॅन्टीन साहित्य खरेदीमध्ये प्रचंड मोठा भ्रष्ट्राचार केला आहे. कारागृह विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी कैद्यांना दिवाळीमध्ये जे फराळाचे साहित्य दिले त्या फराळाच्या साहित्याचे दर हल्दीराम ,काका हलवाई आणि चितळे बंधू यांच्या दर पत्रकाप्रमाणे होते. प्रत्यक्षात कैद्यांना लोकल मार्केटमधील फराळ खरेदी करून देण्यात आला या दरामध्ये जवळपास 40 ते 60% तफावत होती. गत दिवाळीत राज्यामध्ये जवळपास 5 कोटी रूपयाची खरेदी करण्यात आली आहे. सदरची खरेदी करण्यासाठी कोणतीही निवीदा प्रक्रिया करण्यात आली नाही. सोबत फराळाचे साहित्य व त्याचे दरपत्रक टाकले आहे. यावरून कारागृहात किती अनागोंदी कारभार चाललेला आहे हे लक्षात येईल'.
500 कोटीची मागणी केल्याचा आरोप:
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेले वरीष्ठ पोलिस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या भ्रष्टाचार आणि पैसे हडपल्याचा आरोप करण्यात आला आहे. जालिंदर सुपेकर यांनी अमरावती तुरंगात असलेल्या कैद्यांकडून जामीन मिळवून देण्याच्या मोबदल्यात 550 कोटी रुपये मागितल्याचा आरोप ॲड. निवृत्ती कराड यांनी केला आहे. तसेच, गायकवाड यांचे बँक लॉकर्स, सोनं आणि रोख रक्कम जप्त करताना सुपेकर आणि पुण्याचे तत्कालीन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी 100 ते 150 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप देखील ॲड.कराड यांनी केला आहे.