Nitesh Rane: राज्यातील अत्यंत गाजलेल्या आणि संवेदनशील ठरलेल्या दिशा सालियन प्रकरणावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठा भूकंप आला आहे. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (सीबीआय) या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच, भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यांवरून राणे यांनी जोरदार हल्लाबोल केला. हे नेते सातत्याने विधाने करून तपास यंत्रणांवर आणि पीडितेच्या कुटुंबावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा राणे यांनी केला आहे. अशा परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चौकटीत आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन कस्टोडिअल चौकशी करण्याशिवाय सीबीआयकडे दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही, असा दावा त्यांनी केला.
न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न
प्रकरणाची चौकशी सध्या न्यायप्रविष्ट असताना विरोधकांकडून दिल्या जाणाऱ्या इशाऱ्यांवर नितेश राणे यांनी कडक शब्दांत आक्षेप घेतला. उद्धव ठाकरे यांच्याकडून चारित्र्यहननाच्या मुद्द्यावरून न्यायालयात जाण्याचा इशारा देण्यात आला होता. यावर भाष्य करताना राणे म्हणाले की, ठाकरे गटाने यापूर्वीही न्यायालयात आपल्याला या प्रकरणात विनाकारण ओढले जात असल्याचे सांगितले होते, मात्र न्यायालयाने त्यांचे दावे फेटाळून लावले आहेत. जी गोष्ट उच्च न्यायालयाने आधीच अमान्य केली आहे, तीच पुन्हा सार्वजनिक व्यासपीठावर मांडणे म्हणजे थेट न्यायालयाचा अवमान करणे आहे. अशा वक्तव्यांमुळे पीडितेचे वडील सतीश सालियन यांच्यावर मानसिक दबाव निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
हेही वाचा – Sanjay Raut : दिशा सालियन प्रकरणात 'नेपाळी कनेक्शन'चा खळबळजनक दावा; संजय राऊतांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
महाविकास आघाडी सरकारच्या काळात पुरावे नष्ट केल्याचा पुनरुच्चार
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळातील तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नितेश राणे यांनी गंभीर आरोप केले. सहा वर्षांपूर्वी राज्यात सत्ता असताना पोलिसांवर प्रचंड राजकीय दबाव आणून महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. त्यावेळी योग्य प्रकारे चौकशी होऊ शकली नव्हती, परंतु आता परिस्थिती बदलली असून सध्याच्या तपासावर कोणताही राजकीय प्रभाव नाही. सीबीआय सर्व दुवे आणि पुराव्यांच्या आधारे निष्पक्ष तपास करत असून, या माध्यमातून दिशा सालियनच्या कुटुंबाला शेवटी न्याय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.