महायुतीत अंतर्गत वाद पेटला! कथित ऑडिओ क्लिपवरून शिवसेना-भाजपा आमने-सामने; प्रवीण दरेकरांचा रामदास कदमांना कडक इशारा

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 500 कोटी रुपयांच्या देवाणघेवाणीवरून केलेल्या गंभीर आरोपांनंतर दोन्ही पक्षांतील वाद विकोपाला गेला आहे.
महायुतीत अंतर्गत वाद पेटला! कथित ऑडिओ क्लिपवरून शिवसेना-भाजपा आमने-सामने; प्रवीण दरेकरांचा रामदास कदमांना कडक इशारा
Pravin Darekar Ramdas Kadam dispute

महाराष्ट्राच्या राजकारणात महायुतीमधील मतभेद चव्हाट्यावर आले असून, कथित ऑडिओ क्लिपच्या वादावरून आता शिंदेसेना आणि भाजपामध्ये जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 500 कोटी रुपयांच्या देवाणघेवाणीवरून केलेल्या गंभीर आरोपांनंतर दोन्ही पक्षांतील वाद विकोपाला गेला आहे. शिंदेसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी या क्लिपच्या आधारे भाजपावर निशाणा साधल्यानंतर, भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत रामदास कदम आणि शिंदेसेनेला सडेतोड इशारा दिला आहे. सत्तेत एकत्र असताना अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप आम्ही अजिबात खपवून घेणार नाही, असा कडक इशारा दरेकर यांनी दिला आहे.

हेही वाचा – ‘शिंदे साहेबांना संपवायचं असतं तर…;रामदास कदमांवर जरांगे पाटलांचा जोरदार पलटवार; ऑडिओ क्लिपवरून नवा वाद

एकनाथ शिंदेंना संपवण्याच्या आरोपांवर दरेकरांचे प्रत्युत्तर

भाजपातील काही नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला होता. यावर बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, मित्रपक्ष म्हणून एकत्र सरकार चालवत असताना अशा स्वरूपाचे चुकीचे आणि बेजबाबदार विधान करणे अत्यंत अयोग्य आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर झालेल्या आरोपांचे भाजपा कधीही समर्थन करत नाही. ती ऑडिओ क्लिप संशयास्पद असेल, तर सरकारने तात्काळ ‘एसआयटी’ (SIT) चौकशी लावून दुध का दुध आणि पाणी का पाणी करावे. चौकशीतून सत्य समोर आणण्याऐवजी याच्या आड भाजपाला दोष देणे अत्यंत चुकीचे आहे.

पडद्यामागून जरांगेंना रसद पुरवणाऱ्यांची पोलखोल करण्याचा इशारा

आपल्या नेत्यांबद्दल भाष्य करताना दरेकर म्हणाले की, शिंदेसेनेला त्यांच्या नेत्यांचा जसा आदर आहे, तसाच आम्हालाही आमच्या पक्षाचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा अभिमान आहे. जरांगे पाटील जेव्हा मराठा समाजाच्या हक्कासाठी लढत होते, तेव्हा भाजपाने त्यांना पूर्ण पाठिंबा दिला होता. परंतु, जेव्हा फडणवीसांवर वैयक्तिक चिखलफेक सुरू झाली, तेव्हा आम्ही उघडपणे समोर येऊन भूमिका घेतली. त्यावेळी पडद्याआड राहून देवेंद्र फडणवीस यांना राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी आणि बदनाम करण्यासाठी जरांगेंना कोण ताकद देत होते, याचा शोध यथावकाश नक्कीच लागेल, असा सूचक आणि गंभीर इशारा दरेकर यांनी यावेळी दिला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version