पुणे: महाराष्ट्रातील मिनी विधानसभा मानल्या जाणाऱ्या 29 महानगरपालिकांच्या रणसंग्रामाचा निकाल शुक्रवारी (16 जानेवारी 2026) जाहीर झाला आणि राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ‘महाविजय’ मिळवत आपला दबदबा सिद्ध केला, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही घवघवीत यश संपादन केले. मात्र, या निकालाने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांना मोठा धक्का दिला आहे. या धामधुमीत राज्याचे लक्ष वेधून घेतले ते पुणे महानगरपालिकेच्या निकालाने. पुण्याच्या राजकीय इतिहासात घराण्यातील एकापेक्षा जास्त उमेदवारांना निवडून देण्याची परंपरा यंदाही पुणेकरांनी मोठ्या उत्साहात जपल्याचे दिसून येत आहे.
पुण्याच्या मध्यवस्तीतील प्रभाग क्रमांक 23 (रविवार पेठ, नाना पेठ) मधील निकाल तर सर्वांत धक्कादायक ठरला. येथे चक्क सासू आणि सुनेची जोडी विजयी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या सोनाली आंदेकर आणि त्यांच्या सासू लक्ष्मी आंदेकर या दोघींनीही विजयाचा गुलाल उधळला. गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि सध्या तुरुंगात असूनही या दोघींनी मिळवलेला विजय हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. या विजयामुळे आता एकाच प्रभागातून सासू आणि सून एकत्रितपणे महापालिकेत प्रतिनिधित्व करणार आहेत.
पुणे महापालिका निवडणुकीत यंदा ‘पॉवर कपल्स’ आणि ‘फॅमिली पॅक’ची मोठी चर्चा होती. प्रभाग क्रमांक 3 (विमाननगर-लोहगाव) मधून भाजपच्या ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला, तर त्यांचे पती सुरेंद्र पठारे यांनी प्रभाग क्रमांक 4 (खराडी-वाघोली) मधून भाजपच्याच तिकिटावर दणदणीत बाजी मारली. विशेष म्हणजे, सुरेंद्र पठारे यांचे वडील बापूसाहेब पठारे हे राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार असतानाही, मुलगा आणि सुनेने कमळ हाती घेऊन मिळवलेला हा विजय राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. आता ही पती पत्नीची जोडी महापालिकेच्या सभागृहात एकत्र पाऊल ठेवणार आहे.
हेही वाचा: Nashik Election Result 2026: महाजन ठरले संकटमोचक अन् किंगमेकर; नाशिकच्या विजयामागे गिरीश महाजनांनी कसं फिरवलं चक्र?
केवळ पती-पत्नीच नव्हे, तर ‘भाऊ - भाऊ’ देखील आता सभागृहाची शान वाढवताना दिसतील. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या दोन्ही पुत्रांनी निवडणुकीच्या रिंगणात यश मिळवले आहे. प्रभाग क्रमांक 11 (रामबाग कॉलनी, शिवतीर्थनगर) मधून हर्षवर्धन मानकर यांनी राष्ट्रवादीकडून, तर प्रभाग क्रमांक 25 (महात्मा फुले मंडई) मधून राघवेंद्र मानकर यांनी भाजपच्या वतीने विजय मिळवला आहे. दोन वेगवेगळ्या पक्षांतून का असेना, पण एकाच घरातील दोन भाऊ आता पुण्याच्या विकासकामांवर सभागृहात चर्चा करताना दिसणार आहेत.
एकीकडे काही राजकीय घराण्यांनी आपले वर्चस्व राखले असले, तरी दुसरीकडे काही चर्चेतील नावांना मतदारांनी घरचा रस्ताही दाखवला आहे. प्रभाग क्रमांक 10 (बावधन-भुसारी कॉलनी) मधून निवडणूक लढवणाऱ्या जयश्री मारणे आणि प्रभाग क्रमांक 39 मधून राष्ट्रवादीकडून नशीब आजमावणारे बापू नायर यांचा पराभव झाला. पुण्याच्या मतदारांनी यंदा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या काही उमेदवारांना नाकारून, तर काहींना स्वीकारून संमिश्र कौल दिला आहे. एकूणच, नव्या सभागृहात नात्यागोत्यांची वीण घट्ट दिसणार असून हे ‘कौटुंबिक राजकारण’ शहराच्या विकासाला कोणती दिशा देते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
हेही वाचा: BMC Election Result Analysis: ठाकरेंच्या हातातून मुंबई का निसटली? 'ही' धक्कादायक कारणे ठरली टर्निंग पॉइंट