पुणे: आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील युतीनंतर राजकीय वातावरण तापले आहे. याच दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांच्या टीकेला उत्तर देत विकासाचा अजेंडा स्पष्ट केला. “आमची राजकीय इच्छा व्यवस्थित आहे, म्हणूनच सकाळी दोन इंटरव्यू देऊन मी तुमच्यासमोर आलो आहे,” असे म्हणत त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला.
भाजप नेते महेश लांडगे यांनी एकेरी उल्लेख करत केलेल्या टीकेवर अजित पवारांनी उपरोधिक शैलीत प्रत्युत्तर दिले. “तो मोठा नेता आहे. मोठ्या नेत्यांनी छोट्या नेत्यांबद्दल एकेरीच बोलायचं असतं. पण आपल्यापेक्षा लहान असणाऱ्यांना ‘अहो’ वगैरेची भाषा वापरायची नसते,” असा मिश्किल टोला त्यांनी लगावला. पुढे ते म्हणाले, “महेश लांडगे मोठे असल्यामुळे अजित पवार त्यांना चिल्लर वाटतोय,” असे म्हणत त्यांनी लांडगे यांना चिमटा काढला.
“तुमच्या ताटातलं मीठ निघालं का?” या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, “जे मागे झालं ते झालं. ते आता पुन्हा करायचं नाही. त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या. आम्ही उत्तम जाहीरनामा दिला आहे. आम्हाला विकास करायचा आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
पुण्याच्या विकासाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “पुण्याचं गतवैभव आम्हाला परत मिळवून द्यायचं आहे. पुणे महानगरपालिकेत ठरावीक कंत्राटदार डोळ्यासमोर ठेवून टेंडर पास केली जातात; ही पद्धत थांबवायची आहे.” जीएसटी संदर्भातील वादावर ते म्हणाले, “जीएसटीबाबत जो काही प्रश्न किंवा वाद आहे, त्यावर मी स्वतः पुढाकार घेणार आहे. मी जीएसटीचा प्रमुख असल्यामुळे कमिशनर आणि तज्ज्ञांशी समोरासमोर चर्चा करून यातून मार्ग काढला जाईल. चर्चेतून तोडगा निघू शकतो.”
दरम्यान, पुणे महानगरपालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अजित पवार गट यांची युती जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत महत्त्वाचा खुलासा करत निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. “पुणेकरांचा विकास पुढच्या दृष्टीने सोयीचा, पारदर्शक आणि दीर्घकालीन व्हावा, हाच या युतीचा उद्देश आहे,” असा संदेश त्यांनी दिला.
एकूणच, महेश लांडगे यांच्या वक्तव्यावर दिलेले अजित पवार यांचे प्रत्युत्तर, तसेच पुण्याच्या विकासासाठी मांडलेला ठोस अजेंडा, यामुळे पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.