पुण्याच्या राजकीय पटलावर आज एक अशी घडामोड घडत आहे, ज्याने केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे, तर संपूर्ण गुन्हेगारी विश्वातही खळबळ उडवली आहे. आंदेकर टोळीचा म्होरक्या म्हणून ओळखला जाणारा बंडू आंदेकर आज चक्क लोकशाहीच्या रणांगणात उतरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाकडून बंडू आंदेकर त्याचा उमेदवारी अर्ज दाखल करत असून, तुरुंगाच्या भिंतीआडून थेट सत्तेच्या सोपानापर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न पुण्याच्या राजकारणाला कोणत्या वळणावर नेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या गंभीर गुन्ह्याखाली कोठडीत असलेल्या बंडू आंदेकरने निवडणूक लढवण्यासाठी न्यायालयाकडे दाद मागितली होती. "निवडणूक लढवणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे," असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत न्यायालयाने त्याला अर्ज भरण्याची परवानगी दिली.
मात्र, ही परवानगी देताना न्यायालयाने कडक नियमावली आखून दिली आहे. बंडू आंदेकरला कोणत्याही प्रकारचे शक्तीप्रदर्शन, घोषणाबाजी किंवा समर्थकांची गर्दी गोळा करता येणार नाही. कडक पोलीस बंदोबस्तात त्याला भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात आणले जाईल आणि प्रक्रिया पूर्ण होताच पुन्हा कोठडीत रवाना केले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) भूमिकेबाबत मोठी गुप्तता पाळण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाने या उमेदवारांना 'एबी फॉर्म' देऊन हिरवा कंदील दाखवला असला, तरी गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे अधिकृत घोषणा टाळली आहे.
विशेष म्हणजे, या निवडणुकीत केवळ बंडू आंदेकरच नाही, तर आंदेकर कुटुंबातील इतर दोन महिला सदस्याही नशीब आजमावणार आहेत. या कुटुंबातील लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या पत्नी सोनाली आंदेकर आज एकाच वेळी आपले अर्ज दाखल करणार आहेत. आंदेकर कुटुंबाने भवानी पेठ परिसरात आपले राजकीय वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी एकाच वेळी तीन अर्ज भरण्याची ही 'ट्रिपल चाल' खेळल्याचे बोलले जात आहे.
थेट अर्ज भरण्याच्या दिवशीच ही माहिती समोर आल्याने विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे. पुण्याच्या मध्यवस्तीतील राजकारण नेहमीच वर्चस्वाच्या लढाईसाठी ओळखले जाते, तिथे आता 'टोळीयुद्ध' आणि 'मतपेटी' यांचा हा मिलाफ नवीन वादाला निमंत्रण देणारा ठरू शकतो.