NCP Alliance Update: अजितदादांचा आग्रह अन् शरद पवार गटाचा नकार; पुण्यात ‘चिन्हा’च्या लढाईत युतीचं स्वप्न भंगलं

यानंतर शरद पवार गट महाविकास आघाडीसोबत जाणार असून पुण्यात तिरंगी राजकीय लढत अटळ झाली आहे.

NCP Alliance Update: अजितदादांचा आग्रह अन् शरद पवार गटाचा नकार; पुण्यात ‘चिन्हा’च्या लढाईत युतीचं स्वप्न भंगलं

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत सध्या राजकीय भूकंपाचे धक्के बसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युती होणार, अशा चर्चांना उधाण आले होते. दोन्ही बाजूंच्या नेत्यांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला होता आणि चर्चेचे गुऱ्हाळ सकारात्मक दिशेने सुरू होते. मात्र, ऐनवेळी एका तांत्रिक पण अत्यंत संवेदनशील मुद्द्यावर ही संभाव्य युती फिस्कटली असून, पुण्याच्या राजकारणात आता नवीन समीकरणे आकाराला येत आहेत.

या संपूर्ण प्रकरणाची हकीकत अशी की, शरद पवार गटाचे पदाधिकारी जेव्हा अजित पवारांच्या भेटीला गेले, तेव्हा जागावाटपावर एकमत असूनही 'निवडणूक चिन्ह' हा कळीचा मुद्दा ठरला. अजित पवार यांनी पुणे महापालिका निवडणूक राष्ट्रवादीच्या पारंपरिक 'घड्याळ' चिन्हावरच लढवावी, असा आक्रमक पवित्रा घेतला. चिन्हाच्या मुद्द्यावर तडजोड करण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिल्याने युतीची गाडी रुळावरून घसरली.

या घडामोडींनंतर शरद पवार गटाच्या गोटात हालचालींना वेग आला. सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली, ज्यामध्ये 'तुतारी' हीच आपली खरी ओळख असल्याचे अधोरेखित करण्यात आले. स्वाभिमानाशी तडजोड नको, असा सूर उमटताच जयंत पाटील यांनी तातडीने 'मातोश्री' गाठली.

हेही वाचा: Syria Mosque Blast : सीरियात मशिदीत नमाज पठणावेळी भीषण स्फोट; 8 जणांचा जागीच मृत्यू, 18 जखमी

उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या अडीच तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर पुण्यात महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब झाले आणि अजित पवारांसोबतच्या युतीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.

राजकारणातील या वळणाने पुण्यात आता तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट होत आहे. एकीकडे महाविकास आघाडी (शरद पवार गट, शिवसेना-UBT आणि काँग्रेस) सज्ज झाली आहे, तर दुसरीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतही जागावाटपावरून बिनसल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत अजित पवार आणि शिंदे गट एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर असे झाले, तर पुणे महापालिकेत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे-अजित पवार गट असा हाय-व्होल्टेज राजकीय सामना पाहायला मिळेल.

या राजकीय खिचडीमुळे पुण्याचे मतदार आता कोणाला कौल देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. युती तुटल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असला तरी नेत्यांनी मात्र निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. चिन्हाच्या लढाईतून सुरू झालेला हा वाद आता थेट सत्तेच्या संघर्षापर्यंत पोहोचला असून, येत्या काही दिवसांत पुण्यातील राजकारण अधिकच तापण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा: Year-Ender 2025: डिजिटल पेमेंट, एआय आणि लॉयल्टी क्षेत्रात क्रांती; 2026 चं चित्र काय असणार?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number