Ambadas Danve: छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीने हिंसक वळण घेतले असून, शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजपमधील संघर्ष आता थेट हाणामारीवर उतरला आहे. ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप उमेदवाराची कॉलर पकडून त्यांना मारहाण केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमका राडा कशावरून झाला?
पंचायत समिती सभापती निवडणुकीत सदस्यांच्या पळवापळवीवरून हा वाद पेटला. भाजप उमेदवार कल्याण गायकवाड यांनी ठाकरे गटाचे तीन सदस्य फोडल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे. पंढरपूर गणातील लताबाई कानडे, वडगाव कोल्हाडीचे सतीश हिवाळे आणि दत्तात्रय वर्पे हे तीन सदस्य अचानक ‘नॉट रिचेबल’ झाल्याने संतापलेल्या अंबादास दानवेंनी थेट मैदानात उतरून भाजप नेत्याला जाब विचारला.
‘लोकशाहीचा गळा घोटणाऱ्यांना उत्तर दिलं’; अंबादास दानवे
या राड्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करताना दानवे कमालीचे आक्रमक दिसले. ते म्हणाले, “भाजपचे लोक कुठे पैशांचे आमिष दाखवून तर कुठे धमक्या देऊन आमचे सदस्य पळवत आहेत. लोकशाहीची थट्टा करणाऱ्यांना धडा शिकवणे गरजेचे होते, म्हणूनच मी भाजप उमेदवाराला पकडून त्याच्या कानाखाली वाजवली. ही शिवसेना आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे.”
शिंदे गटातही फूट? दानवेंचा खळबळजनक दावा
यावेळी दानवे यांनी केवळ भाजपवरच नाही, तर शिंदे गटावरही निशाणा साधला. भाजपच्या ताब्यात केवळ ठाकरे गटाचेच नव्हे, तर शिंदे गटाचेही काही सदस्य असल्याचे सांगत त्यांनी सत्ताधारी गटात अंतर्गत दोन गट पडल्याचा दावा केला. “आमचे सदस्य जर भाजपसोबत गेले, तर त्याचे परिणाम गंभीर होतील,” असा थेट इशाराही त्यांनी दिला.
बंडखोर सदस्यांना ‘कारवाई’चा अल्टिमेटम
दरम्यान, पक्षाशी प्रतारणा करणाऱ्या सदस्यांनाही दानवे यांनी सुनावले आहे. “शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी करून निवडून आणलेले सदस्य जर गद्दारी करत असतील, तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. आम्ही अजूनही त्यांची वाट पाहत आहोत, त्यांनी तातडीने पक्षाच्या भूमिकेशी प्रामाणिक राहावे,” असे त्यांनी स्पष्ट केले. या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे.