Rahul Gandhi: ‘निवडणुकीत ‘मॅच-फिक्सिंग’ची जबाबदारी ज्ञानेश कुमार यांच्यावर सोपवण्यात आली होती,’ असा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांवर केला आहे. राहुल गांधींनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर पुन्हा एकदा शाब्दिक हल्ला चढवत गंभीर आरोप केले आहेत. आपल्या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर लिहिताना राहुल यांनी म्हटले की, ज्ञानेश कुमार जे त्यावेळी कार्यरत आयएएस अधिकारी होते यांचा सुरुवातीला भाजपसाठी सदस्य भरती करण्यासाठी वापर करण्यात आला. त्यानंतर, मोदी आणि शहा यांनी त्यांची पंच म्हणून नियुक्ती केली आणि त्यांच्यावर भारतातील निवडणुकांमध्ये ‘मॅच-फिक्सिंग’ची जबाबदारी सोपवली.
केरलच्या माजी मुख्य सचिवांचा दावा आणि भाजपचे प्रत्युत्तर
ज्ञानेश कुमार यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती उघड करणाऱ्या एका ट्विटला प्रतिसाद देताना राहुल गांधींनी हे आरोप केले. केरळचे माजी मुख्य सचिव जिजी थॉमसन यांनी दावा केला आहे की, ज्ञानेश कुमार यांनी त्यांना भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास सांगितले होते आणि मंत्रिपदाची ऑफरही दिली होती. राहुल यांच्या या आरोपांना भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांनी कडाडून प्रत्युत्तर दिले आहे. रविशंकर प्रसाद म्हणाले, “हे अत्यंत दुर्दैवी आहे की विरोधी पक्ष विशेषतः काँग्रेस आणि राहुल गांधी एका वर्तमानपत्रातील बातमीच्या आधारे निवडणूक आयोगावर निराधार आणि लज्जास्पद आरोप करत आहेत. आम्ही याचा तीव्र निषेध करतो.”
First, Gyanesh Kumar – then a serving IAS officer – was used to recruit for the BJP. Then Modi and Shah made him the umpire and put him in charge of match-fixing India’s elections. https://t.co/hvdhEfoVgg — Rahul Gandhi (@RahulGandhi) September 26, 2026
भाजप खासदारांनी पुढे सांगितले की, निवडणूक आयोगाने आज अधिकृतपणे एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. आज झालेल्या बैठकीला तिन्ही निवडणूक आयुक्त उपस्थित होते म्हणजेच बातमीमध्ये ज्यांचा उल्लेख आहे तेच अधिकारी. या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, एसआयआर बाबतचे सर्व निर्णय मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही निवडणूक आयुक्त यांच्या एकमताने घेण्यात आले होते.
हेही वाचा – Abhijeet Dipke: CJP चा निवडणूक आयोगावर थेट हल्लाबोल; अभिजीत दीपकेंच्या 5 शब्दांच्या पोस्टने खळबळ
विवादांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची उच्चस्तरीय बैठक
या सर्व विवादीत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त एस. एस. संधू व विवेक जोशी यांनी शनिवारी नवी दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या मुख्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत तिघेही एकत्र असल्याचे छायाचित्रही समोर आले आहे. उल्लेखनीय म्हणजे, निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत आणि मतदार याद्यांच्या सुरू असलेल्या ‘विशेष सखोल पुनरावृत्ती’ (SIR) प्रक्रियेबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात असताना ही बैठक पार पडली. बैठकीनंतर जारी केलेल्या तपशीलवार प्रसिद्धीपत्रकात एसआयआर प्रक्रिया, ईसीआयनेट, फॉर्म 6, दावे आणि हरकती, तसेच अंतर्गत पत्रव्यवहाराबाबत अलीकडे उपस्थित करण्यात आलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले आहे.