Tuesday, June 09, 2026 01:58:15 PM

West Bengal Election 2026: राहुल गांधींचा ममता बॅनर्जींवर 'अगदी ऐन वेळी' निशाणा; भाजपचा राहुल गांधींना खोचक 'थँक्यू'

राहुल गांधींच्या या टीकेचा फायदा घेत भारतीय जनता पक्षाने त्यांना धन्यवाद दिले आहेत. भाजपच्या अधिकृत X हँडलवरून राहुल गांधींचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

west bengal election 2026 राहुल गांधींचा ममता बॅनर्जींवर अगदी ऐन वेळी निशाणा भाजपचा राहुल गांधींना खोचक थँक्यू

West Bengal Election 2026 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालमधील राजकीय स्थितीवर भाष्य करताना मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्यावर थेट प्रहार केला आहे. 'जर ममता बनर्जी यांनी राज्यात पारदर्शक आणि स्वच्छ सरकार चालवले असते, तर भारतीय जनता पक्षाला शिरकाव करण्यासाठी जागा मिळाली नसती,' असे विधान राहुल गांधी यांनी गुरुवारी 23 एप्रिल रोजी केले. टीएमसी सरकारच्या प्रशासकीय अपयशामुळे आणि ध्रुवीकरणाच्या राजकारणामुळेच भाजपचा उदय झाला, असा आरोप त्यांनी केला आहे. राहुल गांधींचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, 'INDIA' आघाडीतील अंतर्गत मतभेद यामुळे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.

भाजपचा राहुल गांधींना खोचक प्रतिसाद
विशेष म्हणजे, राहुल गांधींच्या या टीकेचा फायदा घेत भारतीय जनता पक्षाने त्यांना धन्यवाद दिले आहेत. भाजपच्या अधिकृत X हँडलवरून राहुल गांधींचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून, "राहुलजी टीएमसीबद्दल सतत सत्याचे बॉम्ब फोडत आहेत, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद," अशी उपरोधिक टिप्पणी करण्यात आली आहे. एकीकडे तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस हे राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधी आघाडीत एकत्र आहेत, तर दुसरीकडे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी राहुल गांधींनी टीएमसीवर केलेल्या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता राहुल गांधींच्या या वक्तव्याचा मतदारांवर कसा परिणाम होतो आणि त्याचा भाजपला फायदा मिळतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

वैचारिक लढाईत काँग्रेसच सक्षम असल्याचा दावा
राहुल गांधी यांनी बंगालच्या मतदारांना उद्देशून केलेल्या संदेशात ही निवडणूक काँग्रेस आणि भाजपमधील 'वैचारिक लढाई' असल्याचे म्हटले आहे. त्यांनी दावा केला की, भाजपची विचारधारा संविधानाच्या विरोधात असून केवळ काँग्रेसच त्यांना वैचारिक पातळीवर हरवू शकते. भाजप देशाची विविधता मिटवू पाहत आहे, तर काँग्रेस बंगालच्या संस्कृतीचा आणि भाषेचा सन्मान करते, असेही त्यांनी नमूद केले. बंगालमध्ये न्याय आणि प्रगतीचे सरकार आणण्यासाठी काँग्रेसला मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे केले आहे.

हेही वाचा - West Bengal Election 2026 : बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानावेळी सिलिगुडी आणि मुर्शिदाबादमध्ये राडा; अनेक ठिकाणी तणाव

पहिल्या टप्प्यातील मतदानात तणाव आणि उत्साह
पश्चिम बंगालमध्ये आज 23 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले, ज्यामध्ये दुपारी 3:00 वाजेपर्यंत 68.77 टक्क्यांहून अधिक मतदान झाले. संध्याकाळी उशिरापर्यंत हा आकडा 78 टक्क्यांच्या पुढे गेला होता. भीषण गर्मी आणि दमट हवामान असूनही सकाळी 7:00 वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. पहिल्या दोन तासात 18.76 टक्के, तर 1:00 वाजेपर्यंत 62.18 टक्के मतदान झाले होते. मतदानादरम्यान काही ठिकाणी हिंसाचार आणि भाजप उमेदवारांवर हल्ल्याच्या काही  घटना देखील समोर आल्या आहेत.

निवडणुकीचे समीकरण आणि निकाल
पश्चिम बंगालमधील 294 सदस्यीय विधानसभेसाठी 16 जिल्ह्यांमध्ये आज मतदान झाले, ज्यामध्ये 167 महिलांसह एकूण 1,478 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झाले आहे. मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसी सलग चौथ्यांदा सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे, तर भाजपने यावेळी पूर्ण ताकद लावली आहे. दुसऱ्या टप्प्याचे मतदान 29 एप्रिल रोजी होणार असून, संपूर्ण राज्याचे लक्ष आता 4 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. राहुल गांधींच्या या विधानाचा निकालावर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हेही वाचा - Vaishno Devi Shrine : वैष्णो देवी मंदिराला दान दिलेली 95 टक्के चांदी खोटी, कॅडमियम पदार्थ असल्याने कॅन्सरचा धोका अधिक


सम्बन्धित सामग्री