Raj Thackeray: ठाकरे युतीनंतर मनसेला पहिला मोठा धक्का; विश्वासू नेत्याने धरला शिंदेसेनेचा हात

राज ठाकरे–उद्धव ठाकरे युतीनंतर मनसेला पहिला धक्का बसला आहे. मनसेचे महाराष्ट्र सचिव सुधाकर तांबोळी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Raj Thackeray: ठाकरे युतीनंतर मनसेला पहिला मोठा धक्का; विश्वासू नेत्याने धरला शिंदेसेनेचा हात

Raj Thackeray: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची अधिकृत घोषणा होताच महाराष्ट्राच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असतानाच, मनसेसाठी मात्र ही सुरुवात धक्कादायक ठरल्याचे चित्र आहे. कारण, राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलेली भीती अवघ्या काही तासांत खरी ठरली असून, मनसेच्या जुन्या आणि विश्वासू नेत्याने पक्षाला रामराम ठोकला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सचिव सुधाकर तांबोळी यांनी मनसे सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबईत उशिरा रात्री झालेल्या कार्यक्रमात त्यांनी अधिकृतरित्या शिंदे गटात प्रवेश केला. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर लगेचच हा राजकीय भूकंप घडल्याने, मनसेच्या गोटात अस्वस्थता वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे.

हेही वाचा:BMC Election 2026: भाजपची 'मेरिट' अट आणि शिंदेंचा 'आत्मसन्मान'; जागावाटपाचा तिढा सुटणार की वाढणार?

सुधाकर तांबोळी हे मनसेच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून पक्षाशी जोडले गेलेले नाव मानले जाते. राज ठाकरे यांनी स्थापन केलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेपासून त्यांनी राजकारणाची सुरुवात केली होती. विद्यार्थी चळवळीतून संघटनात्मक काम करत त्यांनी मनसेमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. मनसेच्या स्थापनेनंतरही ते राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते.

मनसेकडून महाराष्ट्र सचिवपदाची जबाबदारी सांभाळतानाच, तांबोळी यांनी शैक्षणिक क्षेत्रातही सक्रिय भूमिका बजावली होती. विशेष म्हणजे, ते मनसेकडून सलग दोन वेळा सिनेट सदस्य म्हणून निवडून आले होते. त्यामुळे त्यांचा पक्षत्याग हा केवळ वैयक्तिक निर्णय नसून, मनसेच्या संघटनात्मक रचनेसाठी तो मोठा धक्का मानला जात आहे, विशेषतः मुंबईसारख्या महत्त्वाच्या राजकीय केंद्रात.

हेही वाचा: MNS Chatrapati Sambhajinagar: ठाकरे युतीच्या जल्लोषात मिठाचा खडा! संभाजीनगर मनसेमध्ये मोठी गळती; नेमकं काय घडलं?

राज ठाकरे–उद्धव ठाकरे युतीनंतर मनसेत अंतर्गत अस्वस्थता आहे का, याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. एकीकडे युतीमुळे मराठी मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण तयार होत असताना, दुसरीकडे पक्षातील काही नेते अस्वस्थ असल्याचे संकेत मिळत आहेत. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना ‘पक्ष फोडण्याचे प्रयत्न होतील’ असा इशारा दिला होता. तांबोळींच्या पक्षांतरामुळे त्या वक्तव्याला दुजोरा मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

येत्या काळात मनसेतून आणखी नेते बाहेर पडणार की राज ठाकरे संघटनात्मक पातळीवर नियंत्रण मिळवणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा धक्का मनसेसाठी किती महागात पडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number