मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 1 नोव्हेंबर रोजी मुंबईत काढण्यात येणाऱ्या ईव्हीएमविरोधी सत्याच्या मोर्चासाठी जनतेला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, मी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना, सर्व मतदारांना आणि जनतेला सांगतोय, या मोर्चात सामील व्हा. दिल्लीला महाराष्ट्रात किती राग आहे हे दाखवण्याची ही वेळ आहे, असे राज ठाकरे म्हणाले. काल राज ठाकरे यांनी मुंबईमध्ये मनसे मेळाव्यामध्ये ईव्हीएम संदर्भातील मुद्दे मांडत जोरदार भाषण केले आणि प्रात्यक्षिक सुद्धा दाखवले.
राज ठाकरे यांनी भाषण करताना म्हटले की, "आज माझी नोकरी होती आणि बॉसने सोडलं नाही हे कारण देवू नका, हवंतर शनिवारपुरतं एक मत त्याच्या गालावर द्या. पण मला वाटतं तुमचा बॉसही मतदार असेल, मग त्यालाही घेऊन या मोर्चा मध्ये."
राज ठाकरे आणि महाविकास आघाडी एकाच भामिकेत
मनसे आणि महाविकास आघाडी (मविआ) म्हणजे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि कॉंग्रेस हे सर्व पक्ष एकत्र येत आहेत. निवडणूक आयोगाचा कारभार, मतचोरी आणि ईव्हीएममधील अनियमितता याविरोधात हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. राज आणि उद्धव ठाकरे एकाच भूमिकेत दिसत असल्यामुळे या मोर्च्याला राजकीय ऐक्याचे प्रतीक मानले जात आहे.
मतचोरी आणि ईव्हीएमविरोधात उठवणारआवाज
राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की, हा मोर्चा निवडणूक प्रक्रियेत होत असलेल्या अनियमिततेविरुद्ध आहे. ईव्हीएममधून होणाऱ्या घोटाळ्यांचा विरोध करण्यासाठी आम्ही हा दणदणीत मोर्चा काढत आहोत. दिल्लीत कळलं पाहिजे की महाराष्ट्रात काय आग पेटतेय ती, असे ते म्हणाले. मोर्च्याद्वारे लोकांना सत्य कळावे आणि मतचोरीबद्दलचा निषेध नोंदवावा, हा या आंदोलनाचा प्रमुख हेतू आहे.
कोण कोण सहभागी होणार या मोर्चात
मनसे, महाविकास आघाडीतील सर्व पक्ष, तसेच डाव्या विचारसरणीचे नेते, सामाजिक संघटना आणि ज्यांना आपले मत चोरीला गेलं असं वाटतं असे नागरिक सहभागी होणार आहेत. शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे तसेच इतर आघाडीचे नेते मोर्चाला मार्गदर्शन करणार आहेत.
मोर्चाची वेळ आणि स्थळ
मोर्चा शनिवार, 1 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता सुरू होईल. तो फॅशन स्ट्रीटवरून सुरू होऊन मेट्रो सिनेमामार्गे मुंबई महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारापर्यंत जाणार आहे. मुंबईकरांना त्रास होऊ नये म्हणून मोर्चा दुपारी 1 ते 4 या वेळेतच पार पाडला जाणार आहे. व्यवस्थापन आणि पुढील दिशा आयोजकांनी पोलिसांना भेटून मार्ग, सुरक्षा आणि वाहतुकीची व्यवस्था निश्चित केली आहे. लोकांची उपस्थिती सुलभ व्हावी यासाठी QR Code प्रणालीद्वारे माहिती देण्यात येणार असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले. मोर्च्यानंतर प्रमुख नेते पुढील आंदोलनाची दिशा ठरवतील, अशी माहितीही देण्यात आली आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी महायुती सरकारच्या नमो पर्यटन केंद्र या योजनेवर टीका केली होती. या टीकेला पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांनी सांगितले की, राज ठाकरे यांनी नमो पर्यटन संकल्पना समजून घ्यायला हवी होती. आम्ही गडकिल्ल्यांवर नाही, तर त्यांच्या पायथ्याला पर्यटन केंद्र उभे करणार आहोत. अपुऱ्या माहितीवरून टीका करणे म्हणजे राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे. शंभूराज देसाई म्हणाले की, शासकीय कोणतेही उभे राहिलेले काम तोडफोड करण्याचा प्रयत्न झाला, तर शासन हाताची घडी घालून गप्प बसणार नाही.
ईव्हीएमविरोधातील आंदोलनातून महाराष्ट्रातील विरोधी पक्ष एकत्र येताना दिसत आहेत. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकाच भूमिकेमुळे या मोर्च्याकडे राज्य आणि देशभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: Nirmala Sitharaman: पावसामुळे निर्मला सीतारामन यांची फ्लाईट डायव्हर्ट; भूतान दौरा स्थगित