Rajnath Singh: ‘नेहरुंना सरकारी पैशाने अयोध्येत बाबरी मशीद बांधायची होती, पण…’ राजनाथ सिंह यांचं मोठं विधान

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या ताज्या वक्तव्यामुळे राष्ट्रीय राजकारणात पुन्हा एकदा नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Rajnath Singh: ‘नेहरुंना सरकारी पैशाने अयोध्येत बाबरी मशीद बांधायची होती, पण…’  राजनाथ सिंह यांचं मोठं विधान

Rajnath Singh: देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या ताज्या वक्तव्यामुळे राष्ट्रीय राजकारणात पुन्हा एकदा नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुजरातमधील बडोदा येथे आयोजित युनिटी मार्च कार्यक्रमात बोलताना त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू आणि बाबरी मशिदीच्या इतिहासाशी संबंधित एक गंभीर दावा केला. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना आलेले हे विधान अधिकच चर्चेचे ठरत आहे.

कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात पंडित नेहरू यांनी सरकारी निधी वापरून अयोध्येत बाबरी मशीद पुन्हा बांधण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी या प्रस्तावाला ठाम विरोध दर्शवला आणि ही योजना प्रत्यक्षात येऊ दिली नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, जर पटेल यांनी हस्तक्षेप केला नसता, तर परिस्थिती पूर्णपणे वेगळी घडली असती.

राजनाथ सिंह यांनी सरदार पटेलांचे कौतुक करताना सांगितले की, देशाच्या ऐक्य आणि एकात्मतेसाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. “आपण आज ज्या व्यक्तिमत्त्वाची जयंती साजरी करतो, त्यांच्यामुळे देश एकत्र राहिला. निर्णयक्षमता, दूरदृष्टी आणि निष्पक्षता ही पटेल यांची मोठी ताकद होती,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

याच कार्यक्रमात संरक्षण मंत्र्यांनी आणखी एक ऐतिहासिक दावा केला. सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, मंदिरासाठी लागणारी आर्थिक मदत नागरिकांनी दानातून दिली होती. या प्रक्रियेसाठी सरकारी कोषातील एक पैसाही वापरला गेला नव्हता. मात्र, या पुनर्निर्माणाबाबतही नेहरूंनी प्रश्न उपस्थित केल्याचा दावा त्यांनी केला. त्यावर सरदार पटेल यांनी “हा वेगळा विषय आहे,” असे स्पष्ट सांगितल्याचे त्यांनी नमूद केले.

राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणात आणखी एक मुद्दा मांडला पटेल यांच्या निधनानंतर त्यांच्या कार्याचा वारसा योग्यरीत्या पुढे नेण्याऐवजी त्याला दडपण्याचे प्रयत्न झाले. नेहरूंनी पटेल यांच्यासाठी जमा झालेले निधी वापरून रस्ते आणि विहिरी बांधण्याची सूचना दिली होती, असा दावा त्यांनी मंचावरून मांडला. त्यानंतर, 1946 मधील काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक, त्यातील नेहरूंची भूमिका आणि गांधीजींच्या विनंतीवर पटेल यांनी मागे घेतलेला निर्णय यांचाही उल्लेख त्यांनी केला.

राजनाथ सिंह यांच्या या भाषणातील दाव्यांमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. नेहरूंच्या वारशावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही विधाने विरोधकांकडून टीकेची झोड उठवण्याची शक्यता मानली जाते. संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने पुढील काही दिवस हे प्रकरण राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी राहणार यात शंका नाही.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number