Rajya Sabha Election 2026: हे वर्ष भारतीय राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. एकीकडे देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत असताना, दुसरीकडे राज्यसभेतील मोठ्या प्रमाणावरील सदस्यांची निवृत्ती होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सात खासदारांचा समावेश असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. त्यांच्या निवृत्तीमुळे महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
राज्यसभेतील एकूण 245 जागांपैकी 2026 मध्ये तब्बल 73 जागांसाठी निवडणूक होणार आहे. एप्रिल, जून आणि नोव्हेंबर या कालावधीत टप्प्याटप्प्याने या जागांवर नवे सदस्य निवडले जातील. यंदा एकूण 71 खासदारांचा कार्यकाळ संपत असून, त्यामध्ये विविध पक्षांतील ज्येष्ठ आणि प्रभावी नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे संसदेत सत्ता-संतुलनावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्राकडे पाहिल्यास, 2 एप्रिल 2026 रोजी राज्यातील सात राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. शरद पवार यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, धैर्यशील मोहन पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रियांका चतुर्वेदी, काँग्रेसच्या रजनी पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या डॉ. फौजिया खान यांचा यामध्ये समावेश आहे. एकाच दिवशी सात खासदार निवृत्त होत असल्याने महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
देशपातळीवर पाहता, भाजपचे सर्वाधिक खासदार यंदा निवृत्त होणार आहेत. तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचा कार्यकाळ जून 2026 मध्ये संपत असून, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हेही राज्यसभेला अलविदा म्हणणार आहेत. याशिवाय उत्तर प्रदेशातून केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मा यांच्यासह अनेक खासदार निवृत्त होत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचाही या यादीत समावेश आहे.
या निवृत्त्यांमुळे राज्यसभेत अनेक जागा रिक्त होणार असून, त्यावर कोणते नवे चेहरे संधी मिळवतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन, काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी, तृणमूल काँग्रेसचे साकेत गोखले, द्रमुक नेते तिरुची शिवा यांसारखी मोठी नावेही या टप्प्यात निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. तसेच राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा कार्यकाळही 2026 मध्ये संपणार आहे.
एकूणच, २०२६ मधील राज्यसभा निवडणुका केवळ औपचारिक प्रक्रिया न राहता, देशाच्या राजकीय दिशेला आकार देणारा निर्णायक टप्पा ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांच्या निवृत्तीनंतर कोणत्या पक्षाला किती बळ मिळते आणि संसदेत कोणते नवे चेहरे प्रवेश करतात, यावर पुढील राजकीय गणित ठरणार आहे.