Jayant Patil: राज्यात सध्या सर्वत्र गुन्हेगारीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून, यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. राज्यातील वाढत्या गुन्ह्यांच्या आलेखावरून त्यांनी विद्यमान सरकारला धारेवर धरले.
नुकत्याच रेल्वेमध्ये घडलेल्या एका गुन्हेगारी घटनेचा विशेष उल्लेख करत जयंत पाटील यांनी राज्यातील सुरक्षा व्यवस्थेवर तीव्र चिंता व्यक्त केली. सध्या समाजात लहान-लहान वादांमधूनही गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले असून, नागरिकांमधील संयम आणि संवेदनशीलता कमी होत चालल्याचे गंभीर निरीक्षणही त्यांनी यावेळी नोंदवले.
पत्रकारांशी गैरवर्तन अयोग्य; संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
याच दरम्यान, खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी केलेल्या कथित गैरवर्तनावरही जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पत्रकारांसोबत अशा प्रकारची भाषा वापरणे अत्यंत चुकीचे आणि अयोग्य असल्याचे त्यांनी म्हटले. जयंत पाटील म्हणाले, “मी त्यांचे ते वक्तव्य पूर्णपणे नीट ऐकलेले नाही; परंतु मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी अत्यंत चुकीच्या शब्दांचा वापर केला आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांसोबत कोणत्याही लोकप्रतिनिधीने अशा प्रकारच्या भाषेचा वापर करणे अजिबात योग्य नाही,” अशा शब्दांत त्यांनी या वर्तनाचा निषेध केला.