मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करणारे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या सामनातील ‘रोखठोक’ या सदरातून खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात विसंवाद आहे. एकनाथ शिंदे यांना दिलेले सत्तेचे वचन भाजपाने न पाळल्यामुळे शिंदे हे स्वत:ला अपमानित केल्याच्या दु:खातून बाहेर पडायला तयार नाहीत. मुख्यमंत्रीपदाच्या काळात शिंदे आणि फडणवीस यांची तोंडे दोन दिशांना होती. आता फडणवीस त्याचे उट्टे काढत आहेत. आता शिंदे यांच्या हातात काहीच राहिलेले नाही. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सध्या फारसे चांगले संबंध राहिलेले नसल्याचे राऊत यांनी त्यांच्या लेखात म्हटले आहे. याच लेखात राऊत यांनी एकनाथ शिंदेंचा आमदारांसोबतचा विमानातील संवाद सांगितला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
आमदारासोबतचा राऊतांचा संवाद
संजय राऊत – 'मुख्यमंत्रीपद पुन्हा मिळालेले नाही याच दुखवट्यात शिंदे अजून आहेत काय?'
आमदार – 'ते त्याच्याही पलीकडच्या समाधी अवस्थेकडे पोहोचले आहेत. शून्यात गेले आहेत'
संजय राऊत – 'शिंदे यांना धक्का बसला आहे काय?'
आमदार – 'ते मनाने कोलमडले आहेत'
संजय राऊत – 'का? काय झालं?'
आमदार – 'निवडणुका तुमच्याच नेतृत्वाखाली लढू आणि 2024 नंतरही पुन्हा तुम्हीच मुख्यमंत्री असाल, चिंता करु नका,
निवडणुकीत सढळ हस्ताने खर्च करा, असं शाहांनी सांगितलं होतं. त्यानुसार शिंदे यांनी प्रचंड पैसा निवडणुकीत टाकला.
पण शाह यांनी दिलेलं आश्वासन पाळलं नाही. आपली फसवणूक झालीय असं शिंदे यांना वाटतंय'
आमदार – 'शिंदे व त्यांच्या लोकांचे फोन टॅप केले जातायत, शिंदे यांची पुरती कोंडी झाली आहे.'
महायुती सरकारकडे बहुमत असतानाही ते अस्थिर आहे. त्यांच्यात आपसात बेबनाव असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी आता अस्वस्थ असलेला शिंदेगटही फुटीच्या तयारीत असल्याचं सांगत शिवसेनेत संशयाचं वातावरण निर्माण करण्याची राजकीय खेळी खेळली आहे.
हेही वाचा : पोलिसांनी तक्रार न घेतल्याने तृतीपंथीयाने केले असे कृत्य, पाहून बसेल धक्का
संजय राऊत यांच्या शिवसेनेबाबतच्या दाव्यावर ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनीही तशीच रि ओढली आहे. ठाकरे गटाचे खासदार राऊत आणि आमदार दानवे यांच्या या वक्तव्याचा भाजपाचे नेते नितश राणे यांनी चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे.
हेही वाचा : चंद्रशेखर बावनकुळे वादात: सोन्याचा मुकुट का झाला चर्चेचा विषय?
महायुतीत आणि शिवसेनेत अंतर्गत असलेल्या असंतोषाबाबत संजय राऊत यांनी केलेले दाव्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या संशयाच्या राजकीय खेळीला सुरूवात झाली आहे. ठाकरे गटाकडून सातत्याने एकनाथ शिंदे यांना डिवचून त्यांना अस्थिर करण्याचा प्रयत्न संजय राऊत करत असतात. आता या नव्या दाव्यामुळे पुन्हा एकदा आरोप-प्रत्योरोपांचा धुरळा उडणार आहे.