मुंबई: राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मंत्री संजय शिरसाट सध्या चर्चेत आहेत. नुकताच, संजय शिरसाट यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहे. 'मी चार टर्म आमदार राहिलो. पुढे राहील की नाही माहीत नाही. राजकारणात कधी थांबलं पाहिजे हे माणसाने ठरवलं पाहिजे. राजकारणात कोणीही अमृत पिऊन आलेलं नसतं', असं संजय शिरसाट म्हणाले. शिरसाट यांच्या विधानाचा अर्थ अनेकांनी 'निवृत्तीचा इशारा' असा लावला.
अशातच, शिरसाट यांच्या विधानावर मात्र विरोधकांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी थेट सोशल मीडियावरून शिरसाट यांच्यावर हल्लाबोल केला. 'सिडकोत मलिदा खाताना थांबावं असं वाटलं नाही, आता मंत्रीपद गमावण्याची वेळ येताच राजकीय निवृत्तीचे वेध लागले', असा टोला रोहित पवारांनी लगावला.
पुढे, रोहित पवार म्हणाले की, 'जमीन मलकांच्या हक्कांकडे दुर्लक्ष करून, सिडकोची हजारो रुपयांची जमीन खासगी बांधकाम व्यावसायिक आणि बिवलकर कुटुंबाच्या घश्यात घालण्यात आली. जोपर्यंत असे काम करणारे लोक राजकारणात आहेत, तोपर्यंत जनतेला त्रास होत राहील. पण आता वय पुढं करून पळ काढू नका. सरकारची 5-6 हजार कोटी रुपयांची जमीन खासगी लोकांच्या घशात घातल्याचा इंच इंच हिशोब द्यावाच लागेल. आता सुट्टी नाही'.
हेही वाचा: Ravindra Dhangekar : धंगेकरांची बेमुदत धरणे आंदोलनाची घोषणा, पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहीत केली 'ही' मागणी
रोहित पवारांच्या आरोपांवर संजय शिरसाट यांनीही डगमगून न जाता प्रत्युत्तर दिलं. शिरसाट म्हणाले की, 'तुम्ही माझ्याबद्दल उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी वेळ आणि ठिकाण निश्चित करा, मी त्यांना समोरासमोर उत्तरे देईन. पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या'. संजय शिरसाट यांच्या निवृत्तीच्या विधानापासून सुरू झालेला हा वाद आता आरोप-प्रत्यारोपांच्या चक्रात अडकला आहे. त्यामुळे, शिरसाट त्यांची बाजू कशी मांडतात आणि विरोधक यावर आणखी कोणते पाऊल उचलतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.