Rohit Pawar: महाराष्ट्रातील उद्योगांच्या सद्यस्थितीवरून आणि कंपन्यांच्या कथित स्थलांतरावरून राजकीय वातावरणात कमालीचा ताप निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारच्या उद्योगविषयक धोरणांवर सडकून टीका केली आहे. विरोधकांकडून खोटा प्रचार केला जात असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला होता. याला उत्तर देताना रोहित पवार यांनी थेट उद्योगमंत्र्यांना प्रेझेंटेशन आणि पुराव्यांसह समोरासमोर संयुक्त पत्रकार परिषद घेण्याचे उघड आव्हान दिले आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती नेमकी कशी खालावली आहे, हे आपण पुराव्यांसह सिद्ध करू असा दावा त्यांनी केला.
एफडीआयमधील घसरण आणि डेटा सेंटर धोरणावर ताशेरे
महाराष्ट्रात नोंदणीकृत कंपन्यांची संख्या 3,96,000 असल्याचे आणि एका वर्षात 41,500 नव्या कंपन्या आल्याचे सरकार सांगत असले, तरी 2014 नंतर प्रत्यक्ष किती उद्योग सुरू झाले असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. तसेच, 2022 ते 2025 या कालावधीत महाराष्ट्रात प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक (FDI) केवळ 18 टक्क्यांनी वाढली आहे. या तुलनेत हरियाणामध्ये 49 टक्के, तमिळनाडूमध्ये 85 टक्के, तेलंगणामध्ये 88 टक्के आणि उत्तर प्रदेशात तब्बल 96 टक्के एफडीआय वाढ नोंदवली गेली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. डेटा सेंटरच्या गुंतवणुकीवर टीका करताना ते म्हणाले की, 2,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीनंतर डेटा सेंटर केवळ 100 लोकांना रोजगार देते, परंतु प्रचंड प्रमाणात वीज आणि पाणी वापरते. त्यामुळे रोजगाराची निर्मिती न करणाऱ्या अशा प्रकल्पांपेक्षा प्रत्यक्ष रोजगार देणाऱ्या उद्योगांची राज्याला गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
महागडी वीज आणि करारांच्या पारदर्शकतेवर सवाल
महाराष्ट्रातून उद्योग शेजारच्या राज्यांत जाण्याचे मुख्य कारण वीजदर असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. राज्यात उद्योगांसाठी विजेचा दर प्रति युनिट 12.5 ते 13 रुपये आणि व्यावसायिक दर 16 ते 17 रुपये आहे, तर इतर राज्यांत हाच दर 7.5 ते 8.5 रुपये आहे. डाव्होस दौऱ्यादरम्यान झालेल्या करारांवर शंका उपस्थित करत त्यांनी आरोप केला की, अवघ्या 10 बाय 10 च्या खोलीत कार्यालये असणाऱ्या कंपन्यांनी हजारो रोजगारांचे दावे करणारे करार केले आहेत. त्यामुळे दाव्होसमध्ये झालेल्या करारांपैकी प्रत्यक्षात किती उद्योगांनी महाराष्ट्रात काम सुरू केले, याची वस्तुस्थिती सरकारने जनतेसमोर मांडावी अशी मागणी त्यांनी केली.