‘राम पूर्णेकर यांनी काही गोष्टी डोळ्यांनी..’ मीनाक्षी शिंदे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर संजय राऊत यांचे स्पष्टीकरण

संजय राऊत यांनी आपल्या स्पष्टीकरणात पुढे बोलताना ठाण्यात माफियाशाही वाढल्याचे सांगत राज्य सरकार आणि गृहखात्याच्या कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढले.
Sanjay Raut
Sanjay Raut

Sanjay Raut on Meenakshi Shinde: ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर महाराष्ट्राचे राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. या हत्याकांडात सत्ताधारी शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीचा थेट सहभाग असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत आणि पूर्णेकर कुटुंबीयांनी केला होता. पूर्णेकर हे मनोरमानगर परिसरातील अवैध बिल्डर लॉबी तसेच ड्रग्ज नेटवर्कच्या विरोधात सातत्याने आवाज उठवत होते आणि याच राजकीय वैमनस्यातून त्यांची हत्या झाल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला.

मीनाक्षी शिंदेंनी आरोप फेटाळल्यावरून संजय राऊतांचे प्रत्युत्तर

आपल्यावर आणि कुटुंबावर झालेले सर्व आरोप मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन फेटाळून लावले. राजकीय द्वेषापोटी आणि सूडबुद्धीने आपले नाव या प्रकरणात गोवले जात असल्याचे सांगत त्यांनी पोलीस तपासाला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली. त्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना संजय राऊत यांनी आपल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले. राऊत म्हणाले की, ‘मी आरोप केलेले नाहीत. त्यांना आरोप म्हणता येणार नाही. एफआयआर मध्ये नाव आलेले आहे. त्या (मीनाक्षी शिंदे) सूत्रधार आहेत. पूर्णेकर कुटुंबीयांनी दिलेल्या पुरवणी जबाबात आणि तक्रारीत मीनाक्षी शिंदे यांचे नाव आले असून पोलिसांनी निष्पक्ष तपास करून दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे.’

हेही वाचा – ‘पूर्णेकरांना न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही’, ठाकरे गटाच्या महिला आघाडीचा इशारा; मीनाक्षी शिंदेंच्या वक्तव्यांचाही घेतला समाचार

कायदा आणि सुव्यवस्थेवरून गृहखात्यावर ताशेरे
संजय राऊत यांनी आपल्या स्पष्टीकरणात पुढे बोलताना राज्य सरकार आणि गृहखात्याच्या कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. ठाणे शहरात गुन्हेगारी आणि माफियांचे साम्राज्य वाढल्याचा पुनरुच्चार करत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी लावून धरली. तसेच, गणेश नाईक हे ठाण्यातील जुने-जाणते नेते असून त्यांनी माफियाशाहीविरोधात आवाज उठवला पाहिजे, अशी अपेक्षा राऊत यांनी व्यक्त केली. पोलीस दबावाखाली काम न करता मुख्य आरोपींना पाठीशी घालण्याचे बंद करतील, अशी अपेक्षा व्यक्त करत राऊत यांनी पूर्णेकर कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत ठाकरे गट हा लढा सुरूच ठेवणार असल्याचे ठामपणे सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version