Thursday, February 12, 2026 03:10:42 AM

Sanjay Raut Slams BJP: ‘पंतप्रधानांनी आत्मचिंतन करायला हवं, त्यांना राजकीय इतिहासाची...’; राऊतांची भाजपवर घणाघाती टीका

भाजप पाठिंबा, महापौर शर्यत आणि नगरसेवक फोडाफोडीच्या आरोपांवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत घणाघाती टीका केली

sanjay raut slams bjp ‘पंतप्रधानांनी आत्मचिंतन करायला हवं त्यांना राजकीय इतिहासाची’ राऊतांची भाजपवर घणाघाती टीका

मुंबईतील राजकीय वातावरण तापले असताना शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि महापौर शर्यतीवर जोरदार टीका केली. विविध मुद्द्यांवर त्यांनी थेट आणि बोचऱ्या शब्दांत भूमिका मांडत आगामी राजकीय संघर्षाची दिशा स्पष्ट केली.

भाजप पाठिंब्याच्या चर्चांवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, एकमेकांवर दबाव टाकण्यासाठी मुद्दाम अशा अफवा पसरवल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालच्या भाषणाचा उल्लेख करत त्यांनी, “पहिल्यांदाच मुंबईत भाजपचा महापौर बसेल, असं बोललं जातंय. पण मुंबईकरांनी दिलेले आकडे पाहिले तर भाजपचा स्पष्ट विजय झालेला नाही,” असा दावा केला. मोदींनी आत्मचिंतन करायला हवं, त्यांना मुंबईच्या राजकीय इतिहासाची नीट माहिती नाही. मुंबईत शिवसेनेची परंपरा आहे, अशी टीकाही त्यांनी केली. भाषण लिहिणाऱ्यांचा इतिहास कच्चा असल्याचं म्हणत त्यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला.

महापौर शर्यतीबाबत बोलताना राऊत म्हणाले की, अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. “भाजपकडूनही सदस्य हलवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री सध्या डावोसहून सगळं लक्ष ठेवून आहेत,” असं ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस दिल्लीला जात असतील तर आनंद आहे, असं ट्विट केल्याचा उल्लेख करत त्यांनी राजकीय घडामोडी वेग घेत असल्याचं सूचित केलं. “मराठी पंतप्रधान होईल,” असं विधान करत त्यांनी पुढील काळात राजकारणात मोठे बदल होतील, असा संकेत दिला.

नगरसेवक उदय सामंत आणि शिंदे गटावर हल्ला चढवताना राऊत म्हणाले, “आमचे नगरसेवक घरी आहेत. पण तुमचे नगरसेवक का डांबून ठेवले जात आहेत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिंदे गट भाजपचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत, कल्याण-डोंबिवलीसह मुंबईतही वेगळे गट स्थापन होऊ शकतात, असा दावा त्यांनी केला. एकनाथ शिंदे यांना ‘लोहपुरुष’ म्हणत, “त्यांना चावी देणारे कोण?” असा सवाल करत त्यांनी केंद्रीय नेतृत्वावरही निशाणा साधला.

नारायण राणेंवर बोलताना राऊत म्हणाले, “तुमचं संख्याबळ तपासा. राणे साहेबांचं वय झालं आहे, त्यांची काळजी घेतली पाहिजे.” ताज हॉटेल भेटीच्या चर्चांवर बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, कोण कुठे जेवायला जातं यावर राजकारण होत नाही. काँग्रेसचे नगरसेवक फुटत नसल्याचं सांगत त्यांनी फोडाफोडीच्या आरोपांना नकार दिला.

महापौर कोण बसणार, या प्रश्नावर राऊत म्हणाले, “आत्ता फक्त चारचा फरक आहे. काय होतं ते पाहू. मुंबईची परंपरा शिवसेनेच्या महापौराची आहे. जेव्हा भाजपचा महापौर बसेल, तेव्हा शोककळा होईल,” असं म्हणत त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली.


सम्बन्धित सामग्री