Cabinet Expansion: महाराष्ट्रातील राजकीय सत्तानाट्यात ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेत (शिंदे गट) सामील झालेल्या 6 खासदारांनी आपापल्या मतदारसंघात जाऊन मतदारांची समजूत काढल्यानंतर, आता सर्वांचे लक्ष दिल्लीतील आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. या संभाव्य विस्तारापूर्वीच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिराला भेट देत विशेष साकडे घातले आहे. विशेष म्हणजे, या देवदर्शनासाठी दोन्ही तरुण नेत्यांनी मध्यरात्री तब्बल 11 किलोमीटरची खडतर पायपीट केली. या संभाव्य मंत्रीपदाच्या शर्यतीत दोघांचीही नावे आघाडीवर असल्याने या अचानक घेतलेल्या देवदर्शनाला राजकीय वर्तुळात मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
3,800 पायऱ्या चढून मध्यरात्री गाठला डोंगर; पहाटे घेतले बालाजीचे दर्शन
या विशेष धार्मिक प्रवासाची माहिती आणि काही खास फोटो पैलवान चंद्रहार पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 25 जूनच्या रात्री 10 ते पहाटे 2:30 वाजेदरम्यान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्यासह ॲड. निलेश देशमुख आणि चंद्रहार पाटील यांनी तिरुपती ते तिरुमला डोंगरावरील 3,800 पायऱ्या चढून जवळपास 11 किलोमीटरचे अंतर पायी पार केले. या सर्वांनी मध्यरात्री डोंगर गाठल्यानंतर पहाटेच्या सुमारास तिरुपती बालाजीचे मुख्य दर्शन घेतले. यानंतर या सर्व नेत्यांनी विजयवाडा येथील कन्यका देवीच्या मंदिरात जाऊन देवीचेही आशीर्वाद घेतले.
‘ऑपरेशन टायगर’ ते तिरुपती दौरा; ओमराजेंच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष
ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडताना ‘ऑपरेशन टायगर’ दरम्यान अनेक खासदार नॉट रिचेबल झाले होते. त्यावेळी ओमराजे निंबाळकर पुण्यात होते. वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येच्या प्रकरणाचा संदर्भ देत त्यांनी नंतर आपली भूमिका स्पष्ट केली होती आणि मतदारसंघाच्या विकासासाठी आपण शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे जाहीर केले होते. पक्षांतरामुळे मतदारसंघातून झालेल्या टीकेला सामोरे गेल्यानंतर, आता थेट श्रीकांत शिंदे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून 11 किलोमीटर चालत ओमराजेंनी बालाजीला काय साकडे घातले, यावरून तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
हेही वाचा – मोठी बातमी! खासदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे-फडणवीसांचा एकत्र विमान प्रवास, चर्चांना वेग
दिल्लीतील लॉबिंग की मंत्रिपदाची आस? राजकीय चर्चांना उधाण
दरम्यान, 6 बंडखोर खासदारांपैकी कोणाची वर्णी दिल्लीत लागणार, याची चर्चा सध्या रंगली आहे. खासदारांनी मुंबई, पुणे, तिरुपती आणि विजयवाडा असा झंझावाती दौरा केला आहे. श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर या दोघांचेही नाव संभाव्य मंत्र्यांच्या यादीत अग्रस्थानी मानले जात असल्याने, या देवदर्शनामागे दिल्लीतील मंत्रिपदाचे साकडे असल्याचे बोलले जात आहे. या हायप्रोफाईल दौऱ्याचे एक्स्क्लुझिव्ह व्हिडिओ आणि फोटो समोर आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.