Sunday, July 13, 2025 09:55:58 AM

शक्तिपीठ महामार्ग लोकांची की सत्ताधाऱ्यांची गरज? - बच्चू कडू

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. 'महामार्ग बांधण्याआधी खऱ्या शक्तिपीठाचे जागरण करा', असा टोला बच्चू कडू यांनी फडणवीसांना लगावला आहे.

शक्तिपीठ महामार्ग लोकांची की सत्ताधाऱ्यांची गरज - बच्चू कडू

नागपूर: राज्य सरकारने शक्तीपीठ महामार्गाच्‍या भूसंपादनासाठी 20,000 कोटी रुपयांची तरतूद करून महामार्ग पुढे रेटण्याचा प्रयत्न सुरू केला असतानाच शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समिती आक्रमक झाली असून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. अशातच, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. 'महामार्ग बांधण्याआधी खऱ्या शक्तिपीठाचे जागरण करा', असा टोला बच्चू कडू यांनी फडणवीसांना लगावला आहे.

हेही वाचा: मुंबईत 7 तारखेला काँग्रेसची महत्वाची बैठक

काय म्हणाले बच्चू कडू?

'धनधान्य देणारी काळी आई ही खरे शक्तिपीठ आहे आणि तिच्यासाठी राबणाऱ्या शेतकऱ्याला न्यायाचा महामार्ग खुला करून देणे हे शासनाचे आद्य कर्तव्य आहे. 85 हजार कोटीचा महामार्ग आम्ही मागितला नाही. तो आमच्यावर थोपवू नये. कर्जमाफीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत काही अडाण्यांचे खिसे भरण्यावर भर देण्याची आवश्यकता नाही. आधी भूमीरूपी खऱ्या शक्तिपीठाचे रक्षण महत्वाचे आहे आणि म्हणूनच शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या सर्व संघटनांना आमचा पाठिंबा आहे', असं वक्तव्य प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केलं आहे. सोशल मीडियावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एक व्यंगचित्रही बच्चू कडू यांनी शेअर केले आहे. सध्या, या व्यंगचित्राची चांगलीच चर्चा होत आहे.

राज्यात शक्तिपीठ महामार्गावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले आहेत आणि शक्तिपीठ महामार्गाला तीव्र निषेध करत आहेत. 'शेतकऱ्यांचा नुकसान करणारा हा महामार्ग नको', अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी आणि विरोधकांनी घेतली आहे. शक्तिपीठ महामार्गालगतची १२ जिल्ह्यांमधील ३६३ गावे बाधित आहेत. महाराष्ट्रातील जनतेवर ८६,००० कोटी रुपयांचा भार लादणारा शक्तीपीठ महामार्ग रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या समांतर आहे. या दोन्ही महामार्गांमधील किमान अंतर २ किमी आणि कमाल अंतर ३० किमी आहे. नकाशावरून असे दिसून येते की महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमधून जाणारे दोन्ही महामार्ग समांतर आहेत. 'भविष्यात गरज पडल्यास सध्या असणारा रत्नागिरी नागपूर महामार्ग चौपदरी ऐवजी सहा किंवा आठ पदरी करणे सहज शक्य असताना आता शक्तिपीठ महामार्गाचा अट्टाहास कशासाठी? ५० हजार कोटीचा ढपला पाडण्यासाठीच?', अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.


सम्बन्धित सामग्री