मुंबई: दादर पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. लाल रंग फेकणारी व्यक्ती नेमकी कोण आहे? स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग का फेकण्यात आला? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे, शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. त्यामुळे, छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
हेही वाचा: Charlie Kirk: 'चार्ली कर्कला मारले कारण...'; कर्कच्या मारेकऱ्याने जोडीदाराला सांगितला होता हत्येचा संपूर्ण कट
नेमकं प्रकरण काय?
बुधवारी सकाळी सहा ते सातच्या दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ एका अज्ञात व्यक्तीने लाल रंग फेकला. या घटनेनंतर, साडेनऊ वाजल्याच्या सुमारास ठाकरे गटाचे शिवसैनिक जमा झाले. तसेच, क्षणाचाही विलंब न करता त्यांनी स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची साफ-सफाई केली. सोबतच, उद्धव ठाकरे यांना देखील या घटनेची माहिती देण्यात आली. या घटनेनंतर, स्थानिक आमदार महेश सावंत याठिकाणी पोहोचले. शिवसेनेचे नेतेदेखील याठिकाणी दाखल झाले. काही वेळापूर्वी, शिवसेना ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर राऊतदेखील उपस्थित झाले. यासोबतच, खासदार अनिल देसाई घटनास्थळी येऊन पाहणी केली.
स्वर्गीय मीनाताई ठाकरे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी आणि उद्धव ठाकरे यांच्या आई होत्या. 1995 मध्ये मीनाताई ठाकरे यांचं निधन झालं. स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या आठवणीत दादर पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात त्यांचा पुतळा उभारण्यात आला. विशेष म्हणजे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा शिवतीर्थ बंगलाही याच परिसरात आहे.