Eknath Shinde Plans Major Organizational Changes in Shivsena : शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता पक्ष संघटनेत मोठे फेरबदल करण्याचे संकेत दिले आहेत. "जे काम करतील तेच पदावर राहतील," अशा कडक शब्दात त्यांनी पदाधिकाऱ्यांना बजावले असून अकार्यक्षम नेत्यांना थेट बाजूला करण्याची तयारी सुरू केली आहे. गेल्या आठवड्यात पुण्यातील शिवसेनेची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करून शिंदेंनी राज्यातील इतर नेत्यांना एक स्पष्ट संदेश दिला आहे. आता केवळ पदावर बसून राहणाऱ्यांची गय केली जाणार नाही, तर प्रत्यक्ष कामाच्या जोरावरच पक्षात स्थान मिळेल, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
दोन मंत्र्यांवर टांगती तलवार
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल पाहता, एकनाथ शिंदे आपल्या मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांवर कमालीचे नाराज असल्याचे समजते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये शिंदे यांनी राज्यभर दौरे करूनही, काही मंत्र्यांना त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात पक्षाला अपेक्षित यश मिळवून देता आले नाही. नागपूर अधिवेशनावेळीच हे फेरबदल होणार होते, परंतु निवडणुकांमुळे ते लांबणीवर पडले होते. मात्र, आता अकार्यक्षम मंत्र्यांना बाजूला करून नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
'निधी'साठी येणाऱ्यांना स्थान नाही
पक्षात आता 'क्वांटिटी' पेक्षा 'क्वॉलिटी'ला महत्त्व दिले जाणार आहे. जे नेते केवळ निधीसाठी पक्षात येतात, त्यांना बाजूला सारले जाईल, असे संकेत शिंदेंनी दिले आहेत. आगामी 3 वर्षे कोणतीही मोठी निवडणूक नसल्याचा फायदा घेत, राज्यातील सर्व 43,000 गावांपर्यंत शिवसेना पोहोचवण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे. आमदार आणि खासदारांना त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघाव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांची आणि लोकसभा क्षेत्राची जबाबदारी सोपवण्यात आली असून, त्यांच्या कामाचा वैयक्तिक रिपोर्ट स्वतः एकनाथ शिंदे तपासणार आहेत.
हेही वाचा - Sunetra Pawar Property: पवार कुटुंबाच्या मालमत्तेचा थक्क करणारा लेखाजोखा; शरद पवार की सुनेत्रा पवार कोण आहे वरचढ?
भाजपच्या धर्तीवर 'बीएलए' मॉडेल
शिवसेनेची कार्यपद्धती आता भारतीय जनता पक्षाच्या धर्तीवर शिस्तबद्ध असणार आहे. निवडणुका नसल्या तरीही प्रत्येक मतदार यादीवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक BLA (बूथ लेव्हल एजंट) स्तरावर काम वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आगामी वर्षात मतदारसंघांचे पुनर्रचना किंवा विभाजन होण्याची शक्यता लक्षात घेऊन पक्ष संघटना सज्ज ठेवण्यावर शिंदेंचा भर आहे. मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण आणि बूथ स्तरावरील बांधणी हा आता शिवसेनेचा मुख्य अजेंडा असणार आहे.
पदाधिकाऱ्यांचे थेट परीक्षण
मंत्र्यांपासून ते शाखाप्रमुखांपर्यंत सर्वांच्या कामाचा आढावा आता स्वतः मुख्यमंत्री स्तरावरून घेतला जाणार आहे. संपर्क प्रमुख, विभाग प्रमुख, महिला आघाडी आणि जिल्हा प्रमुखांनी पक्ष वाढीसाठी काय योगदान दिले, याचे परीक्षण केले जाईल. शिंदेंनी स्पष्ट केले आहे की, पक्ष वाढीसाठी जे घाम गाळतील, त्यांनाच भविष्यात मोठी पदे दिली जातील. या नव्या कार्यपद्धतीमुळे शिवसेनेत अंतर्गत खळबळ माजली असून, अनेक बड्या नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
हेही वाचा - Baramati Bypoll Election 2026 : अखेर लढत होणारच! बारामतीत सुनेत्रा पवारांचा विजय खडतर; निवडणुकीसाठी तब्बल 55 अर्ज दाखल