Friday, July 11, 2025 11:56:11 PM

शिवसेनेच्या 'या' बड्या नेत्याचं शिंदेंना पत्र

उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर घणाघात टीका केली. त्यानंतर, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदेंना एक पत्र लिहिले.

शिवसेनेच्या या बड्या नेत्याचं शिंदेंना पत्र

मुंबई: ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा 5 जुलै रोजी वरळीमधील डोममध्ये साजरा करण्यात आला. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर घणाघात टीका केली. त्यानंतर, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदेंना एक पत्र लिहिले. 

प्रताप सरनाईक काय म्हणाले?

'आपल्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाची विजयी वाटचाल सुरु आहे. आपण मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या, आपल्या संकल्पनेतून सुरू झालेल्या अनेक कल्याणकारी योजना यशस्वीपणे राज्यात सुरू आहेत. महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत उंचीवर जात आहे. पण आपल्या राज्यात , गेले काही दिवस मराठी भाषेचे निमित्त करुन स्वार्थी राजकारण पुन्हा एकदा सुरू झाले आहे. त्यामुळे या पत्रातून मनातल्या भावना व्यक्त कराव्याशा वाटल्या', असं सरनाईक म्हणाले.

'मराठीच्या हितासाठी आम्ही एकत्र येत आहोत असे उबाठा गट , मनसे सांगत आहेत. मग काही वर्षांपूर्वी हे लोक वेगळे कोणाच्या हितासाठी झाले होते? मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी संस्कृती यांच्याविषयी त्यांना काडीचे प्रेम नाही, केवळ मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून ही मंडळी एकत्र येत आहेत हे सुज्ञ जनता ओळखून आहे. राक्षसाचा जीव पोपटात असतो अशी एक लोककथा मराठीत आहे. यांचा जीव महापालिकेत अडकलेला आहे. महापालिकेच्या तिजोरीत यांचा आत्मा आहे. शनिवारी वरळी येथे झालेल्या मेळाव्यात सुध्दा त्यांचा स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडाच पहायला मिळाला. सत्ता गेल्यामुळे ते किती अगतीक झाले आहेत याची प्रचिती उभ्या महाराष्ट्राला पदोपदी येत आहे. उबाठाचे राजकारण अत्यंत खोटारडे, स्वार्थी आणि विश्वासघातकी आहे. त्यामुळेच त्यांचा एक एक सहकारी त्यामुळेच त्यांना सोडून जात आहे', असं सरनाईक यांनी नमूद केले.

गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है

पुढे सरनाईक म्हणाले की, 'मराठीची टोपी घालून, अनेक वर्षे ऊबाठा गटाने मुंबई महापालिकेची सत्ता उपभोगली. परंतु त्यांनी आजवर मुंबई आणि मराठी माणसांना टोपी घालण्याचेच काम केले. त्यांच्या या टोपीखाली दडलंय काय ? तर केवळ स्वार्थ आणि अप्पलपोटेपणा दडलेला आहे. कोविड रुग्णांची खिचडी खाऊन गब्बर झालेली ही मंडळी मिठी नदीतील भ्रष्टाचाराच्या गाळात हे खोलवर अडकून पडली आहेत. मराठी भाषेचे कैवारी किंवा ठेकेदार असल्याचा आव आणणारांनी मराठीचे जेवढे नुकसान केले तेवढे कुणीच केले नसेल. गेली अनेक वर्षे फक्त भाषेच्या मुद्यावर राजकारण करणाऱ्यांनी 'मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार', 'मुंबई तोडण्याचा डाव' असा अपप्रचार करून वर्षानुवर्षे लोकांची मते लाटली. प्रत्यक्षात मुंबईचा नाही तर फक्त स्वतःचाच विकास 'उबाठा'ने केला. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची हिंमत कोणीच करणार नाही हे यांना चांगलेच माहिती आहे, परतुं तरीही ते दरवेळी बागुबलबुवा उभा करतात. 'गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है' असा हा प्रकार आहे. लोकांना खोटी भीती दाखवयाची आणि स्वतः 'गब्बर' होऊन 'गबर' व्हायचे, असे यांचे धोरण आहे'.

 

 

प्रत्येक शिवसैनिकाला आपला अभिमान वाटतो

वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि कार्य आपणच पुढे नेत आहात. स्वतःच्या तब्येतीची काळजी न करता, जिवाची पर्वा न करता आपण लोकासाठी काम करीत आहात. मी गेल्या 30 वर्षांपासून आपला सहकारी म्हणून आपल्यासोबत काम करीत असताना मला आणि प्रत्येक शिवसैनिकाला आपला अभिमान वाटतो. आपले नेतृत्व, कर्तृत्व आणि आपली काम करण्याची कार्यपद्धती यामुळे आज लाखो लोक आपल्या सोबत आणखी जोडले जात आहेत. आपल्याकडे येण्याचा ओघ सुरु आहे. आपले कार्य असेच सुरू ठेवा. महाराष्ट्र, मराठी माणूस आणि मराठी मन आपल्याच सोबत आहे.


सम्बन्धित सामग्री