K. Annamalai: भाजपच्या (BJP) प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर माजी आयपीएस अधिकारी के. अण्णामलाई यांनी शुक्रवारी एका नवीन राजकीय पक्षाच्या स्थापनेची मोठी घोषणा केली आहे. एका विशेष पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आपल्या भविष्यातील राजकीय योजनांची रूपरेषा मांडली. "मी भाजपचा राजीनामा दिला असून आजपासून माझ्या आयुष्यातील एका नवीन प्रवासाची सुरुवात होत आहे. मी एक नवीन राजकीय चळवळ सुरू करत आहे आणि त्यासाठी मला जनतेच्या पाठिंब्याची गरज आहे. आमचा हा नवीन पक्ष तामिळनाडूची आगामी विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढवेल," अशी घोषणा अण्णामलाई यांनी केली.
रजनीकांत यांनी दिली होती स्वतःच्या पक्षात येण्याची ऑफर
तमिळनाडूच्या राजकारणात 'स्वच्छ राजकारण' आणणे हेच आपले मुख्य ध्येय असल्याचे अण्णामलाई यांनी स्पष्ट केले. घराणेशाहीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी पक्षात पदाच्या कार्यकाळावर मर्यादा (term limits) घातल्या जातील, असे त्यांनी सांगितले. आपल्या भूतकाळातील राजकीय प्रवासावर भाष्य करताना ते म्हणाले, "हा प्रवास सोपा नव्हता. मी 2009 मध्ये डीएमडीके (DMDK) सोबत काम केले आणि 2020 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. 24 ऑगस्ट 2020 रोजी, ज्या दिवशी मी भाजपमध्ये प्रवेश करणार होतो, त्याच दिवशी अभिनेते रजनीकांत यांचा मला फोन आला होता. त्यांनी मला त्यांच्या पक्षात येण्याची ऑफर दिली होती. मात्र, मी आधीच भाजप नेते बी.एल. संतोष यांना शब्द दिला असल्याने मी रजनीकांत यांची ऑफर नम्रपणे नाकारली."
पक्षाची धोरणे लवकरच स्पष्ट होणार
अण्णामलाई यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या नवीन पक्षाची तत्त्वे आणि धोरणे येत्या काळात जाहीर केली जातील. "पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल माझ्या मनात नेहमीच आदर राहील. परंतु, जर एखाद्या मुद्द्यावर भाजपशी आमचे मतभेद झाले, तर आम्ही ते अत्यंत गांभीर्याने आणि ठामपणे मांडू. भाजपमध्ये असतानाही मी 'त्रिभाषा धोरणा'ला जाहीर विरोध केला होता," असे त्यांनी आवर्जून सांगितले. अमित शाहा यांच्या भेटीचा उल्लेख करत ते म्हणाले, "मी तामिळनाडूत बसून दुरूनच राजीनामा पत्र पाठवणारा नेता नाही. मी दिल्लीत जाऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली, मला पक्षात आढळलेल्या त्रुटी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आणि त्यानंतरच सन्मानाने राजीनामा दिला."
भाजपकडून अखेर राजीनामा स्वीकारला
विशेष म्हणजे, भाजप नेते नितीन नबीन यांनी शुक्रवारी अण्णामलाई यांचा राजीनामा अधिकृतपणे स्वीकारला. यासह अण्णामलाई आणि भाजपचे तब्बल 6 वर्षांनंतर मार्ग वेगळे झाले आहेत. तत्पूर्वी, अण्णामलाई यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि नितीन नबीन यांची भेट घेतली होती, तेव्हा भाजपने त्यांना त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली होती, मात्र अण्णामलाई आपल्या निर्णयावर ठाम राहिले.
हेही वाचा – Nagpur RSS Mohan Bhagwat : 'देशाचा विकास रोखण्यासाठी अनेक शक्ती कार्यरत', सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य
आयपीएस ते तमिळनाडू भाजपचे 'सिंघम' प्रमुख
कर्नाटक केडरचे आयपीएस (IPS) अधिकारी राहिलेल्या अण्णामलाई यांनी आपल्या सेवेचा राजीनामा दिल्यानंतर 2020 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. आपल्या आक्रमक कार्यशैलीमुळे समर्थकांमध्ये 'सिंघम' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अण्णामलाई यांची 2021 मध्ये तमिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी एल. मुरुगन यांची जागा घेतली होती, ज्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली होती. आता अण्णामलाई यांनी स्वतःचा नवा मार्ग निवडल्याने तामिळनाडूच्या राजकारणात एक मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.