NCP Crisis: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) अंतर्गत संघर्ष तीव्र झाला असून, अस्वस्थ आमदारांनी आता थेट शरद पवार यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 'सध्याच्या परिस्थितीत पक्षात टिकणे कठीण झाले आहे, आता तुम्हीच मार्ग दाखवा,' अशा शब्दांत काही आमदारांनी पवारांना साद घातल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पक्षांतर्गत वर्चस्ववादाचा भडका
दरम्यान, अजित पवार यांच्यानंतर पक्षाची सूत्रे सुनेत्रा पवार यांच्याकडे आली आहेत. मात्र, नुकत्याच घडलेल्या काही घटनांमुळे ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे समोर आले आहे. 29 एप्रिल 2026 रोजी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांसारख्या अनुभवी नेत्यांची नावे नसल्याचे उघड झाले. पक्षाची पूर्ण धुरा सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्याभोवतीच फिरत असल्याने पटेल आणि तटकरे गटाचे महत्त्व कमी केल्याची चर्चा पक्षात सुरू आहे. भविष्यातील राजकीय कारकीर्द धोक्यात आल्याच्या भावनेतून अनेक आमदारांनी शरद पवार यांच्याकडे पुन्हा परतण्याची इच्छा व्यक्त केल्याचे समजते.
सुनील तटकरेंची नाट्यमय माघार
या सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी मुंबईत एक नाट्यमय राजकीय भेट घडली. प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली होती. मात्र, तिथे घडलेला प्रसंग चर्चेचा विषय ठरला आहे. प्रफुल्ल पटेलांसोबत सुनील तटकरे देखील शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचले, ज्याची कल्पना खुद्द पवारांनाही नव्हती. ही गुप्त भेट होणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचले. तिथे पत्रकारांची गर्दी पाहून तटकरे कमालीचे अस्वस्थ झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आणि संभाव्य वाद टाळण्यासाठी तटकरे शरद पवारांशी कोणताही संवाद न साधता तडकाफडकी तिथून निघून गेले.
भविष्यातील संकेत
एकीकडे पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आणि दुसरीकडे आमदारांची नाराजी, अशा दुहेरी पेचात अजित पवार गट सापडला आहे. आमदारांनी शरद पवारांकडे लावलेला मदतीचा तगादा पाहता, महाराष्ट्रात लवकरच मोठा राजकीय फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.