मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात झपाट्याने घडामोडी घडत आहेत. ऑपरेशन टायगरची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतानाच आता ठाकरे गटाचे खासदार हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे ९ पैकी ६ खासदार त्यांची साथ सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या असून सध्या हे खासदार दिल्लीला रवाना झाल्याचे समजते. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाला बळ मिळणार असून ऑपरेशन टायगरला यश आल्याचे बोलले जात आहे. शिवसेना उबाठा गटाच्या काही खासदारांनी आज, बुधवारी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांची वेळ घेतल्याची माहिती समोर येत आहे. हे खासदार लोकसभा अध्यक्षांना भेटून वेगळा गट स्थापन केल्याचा दावा करणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील काल रात्री दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. येत्या दोन दिवसात शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होणार आहे. अशावेळी दिल्लीवारीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असलेल्या खासदारांचा गट एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी रविवारी खासदारांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीला चार खासदार प्रत्यक्ष हजर होते. तर पाच खासदार ऑनलाइन उपस्थित होते. ऑनलाइन उपस्थित असलेल्या खासदारांनी त्यांच्या अनुपस्थिती मागील वेगवेगळी कारणे दिली असली, तरी हे खासदार प्रत्यक्षात एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात होते.
कोण आहेत हे सहा खासदार ?
संजय दिना पाटील
संजय देशमुख
नागेश पाटील अष्टेकर
ओमराजे निंबाळकर
भाऊसाहेब वाकचौरे
संजय जाधव
अपना सपना मनी..मनी!
महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी…आज रात्री प्रत्येकी
१५ कोटींचा एडवांस देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे!@Dev_Fadnavis — Sanjay Raut (@rautsanjay61) June 16, 2026
ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट दुजोरा दिल्याची चर्चा रंगली आहे. राऊत यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. “अपना सपना मनी.. मनी! महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी आज रात्री प्रत्येकी 15 कोटी रुपयांचा अॅडव्हान्स देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे,” असे ट्विट राऊत यांनी केले आहे. या ट्विटमधून काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना बळ मिळाले.