Rohit Pawar: महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘पॉवर सेंटर’ मानल्या जाणाऱ्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. मात्र, ही निवडणूक एका अत्यंत दुःखद आणि धक्कादायक पार्श्वभूमीवर होत असल्याने बारामतीसह संपूर्ण राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, बारामतीकरांसाठी ही निवडणूक भावनिकदृष्ट्या अत्यंत कठीण ठरणार आहे.
रोहित पवारांची भावूक प्रतिक्रिया; “स्वप्नातही वाटलं नव्हतं”
अजितदादांच्या निधनामुळे त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. राजकीय वाटा वेगळ्या असल्या तरी रोहित पवार यांनी नेहमीच अजितदादांना पितृतुल्य मानले होते. निवडणुकीच्या घोषणेनंतर आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना रोहित पवार म्हणाले की, “ज्या मतदारसंघात कधी केवळ ‘मताधिक्य’ किती असेल याचीच चर्चा व्हायची, तिथे आज पोटनिवडणूक घ्यावी लागत आहे, असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण दुर्दैवानं अजितदादा आपल्यातून गेले. कधी कधी वास्तव हे कल्पनेपेक्षाही अधिक भयंकर असतं.” या प्रतिक्रियेतून काका-पुतण्यांमधील रक्ताचे नाते आणि आदर स्पष्टपणे दिसून आला.
3 दशकांचा अजिंक्य वारसा
बारामती आणि अजित पवार हे एक अतूट समीकरण राहिले आहे. 1991 ते 2024 या प्रदीर्घ काळात अजित पवार यांनी सलग 8 वेळा या मतदारसंघातून विक्रमी विजय मिळवला होता. विकासकामांचा डोंगर उभा करून त्यांनी बारामतीचा चेहरामोहरा बदलला. आता त्यांच्या निधनानंतर होणाऱ्या या पहिल्याच निवडणुकीत त्यांचा वारसा पुढे कोण नेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजितदादांच्या कार्याचा आदर म्हणून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भावनाही काही स्तरांतून व्यक्त होत आहे.
ज्या निवडणुकीत फक्त मताधिक्याचीच चर्चा व्हायची त्या बारामती मतदारसंघात कधी पोटनिवडणूक घ्यावी लागेल, असं कुणाला स्वप्नातही कधी वाटलं नाही.. पण दुर्दैवाने अजितदादा आपल्यातून गेले आणि आज बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली.. कधी कधी वास्तव हे कल्पनेपेक्षाही अधिक… — Rohit Pawar (@RRPSpeaks) March 15, 2026
मैदानात कोण? बिनविरोध निवडणुकीची चर्चा
या पोटनिवडणुकीसाठी सध्या सुनेत्रा पवार (अजितदादांच्या पत्नी) यांचे नाव आघाडीवर असून महायुतीने त्यांच्या नावाला पाठिंबा दर्शवल्याचे समजते. मात्र, सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, अजितदादांना श्रद्धांजली म्हणून ही निवडणूक बिनविरोध होणार का? बारामतीच्या राजकीय इतिहासात ही निवडणूक अत्यंत संवेदनशील वळणावर आली असून, विरोधी पक्ष यावर काय भूमिका घेतात आणि बारामतीकर कोणाच्या पाठीशी उभे राहतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.