मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबातून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या आज सायंकाळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. शपथविधीसाठी त्या मुंबईकडे रवाना झाल्या असून, या सोहळ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्याकडे असलेली काही महत्त्वाची खातीही सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातील किमान एक अतिरिक्त खाते त्यांच्याकडे येऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे केवळ उपमुख्यमंत्री पदाचाच नव्हे, तर मंत्रिमंडळातील जबाबदाऱ्यांचाही आज निर्णय होण्याची शक्यता आहे.
या शपथविधीवर राज्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे आणि नेत्यांचे लक्ष केंद्रित झाले असून, विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी आणि त्यानंतर घेतले जाणारे निर्णय राज्याच्या सत्ताकारणासाठी महत्त्वाचे मानले जात आहेत.
हेही वाचा: Devendra Fadanvis : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी...', उपमुख्यमंत्री पदाच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्ट मत
दरम्यान, या सगळ्या घडामोडींमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न चर्चेत आहे, तो म्हणजे सुप्रिया सुळे या आजच्या शपथविधीला उपस्थित राहणार का? सध्या संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, सुप्रिया सुळे दिल्लीमध्ये जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे त्या मुंबईत होणाऱ्या शपथविधीला उपस्थित राहतात की दिल्लीला रवाना होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतरच्या काळात सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांना या दुःखद प्रसंगात खंबीर आधार दिल्याचे चित्र सर्वांनी पाहिले होते. कुटुंबीयांसोबत त्या सातत्याने उभ्या राहिल्या होत्या. त्यामुळे आजच्या शपथविधीला त्यांची उपस्थिती राहणार का, याबाबत राजकीय तसेच भावनिक पातळीवरही मोठी उत्सुकता आहे.
एकूणच, आजचा शपथविधी हा केवळ एका पदग्रहणापुरता मर्यादित नसून, अजित पवार यांच्या निधनानंतरच्या नव्या राजकीय अध्यायाची सुरुवात मानली जात आहे. या सोहळ्याला कोणकोण उपस्थित राहतात आणि कोणते निर्णय घेतले जातात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
हेही वाचा: Sharad Pawar on NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाआधीच दादांची एक्झिट, अजितची इच्छा पूर्ण करणार; शरद पवार नेमकं काय म्हणाले...