बारामती: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असतानाच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना केलेले भावनिक भाषण सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.
दिवंगत ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी निवडणूक होत असून, अर्ज भरताना सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
“दादांचं जाणं म्हणजे राज्याची हानी”
भाषणात त्या म्हणाल्या, “अजित दादांना जाऊन दोन महिने झाले, पण आजही विश्वास बसत नाही की ते आपल्यात नाहीत. त्यांचं जाणं ही केवळ माझी वैयक्तिक हानी नाही, तर बारामती आणि राज्याची मोठी हानी आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “बारामती दादांसाठी आईसारखी होती, आणि येथील प्रत्येक नागरिक त्यांच्यासाठी पांडुरंगासारखा होता. बारामती म्हणजेच दादांचा श्वास होता.”
भावनिक आवाहन
सुनेत्रा पवार म्हणाल्या, “बारामतीकरांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मी माझं दुःख बाजूला ठेवलं आहे. तुमचं प्रेम आणि साथ यामुळेच मला पुढे जाण्याचा धीर मिळतो.”
हेही वाचा: Donald Trump: उलट-सुलट केलेली वक्तव्य येणार अंगलट; डोनाल्ड ट्रम्प यांचे राष्ट्राध्यक्षपद जाणार?
त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करत सांगितले की, “ही केवळ निवडणूक नाही, तर अजित दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याची संधी आहे.”
शरद पवारांचा उल्लेख
या वेळी त्यांनी शरद पवार यांचाही उल्लेख करत म्हटले की, “बारामतीला दूरदृष्टी देण्याचे काम शरद पवार साहेबांनी केले, तर त्या विकासाला पुढे नेण्याचे काम अजित दादांनी केले.”
राजकीय चुरस कायम
दरम्यान, या निवडणुकीत काँग्रेसकडून अशोक मोरे हे मैदानात असून त्यामुळे लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी माघार घेतली असली तरी काँग्रेसचे उमेदवार अशोक मोरे हे या निवडणुकीत कायम राहतात की माघार घेतील, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
एकूणच, सुनेत्रा पवार यांच्या भावनिक भाषणामुळे बारामतीतील राजकीय वातावरण अधिकच संवेदनशील झाले असून, मतदार कोणाला कौल देतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: Anjali Damania on Kharat Case : खरात प्रकरणावरून दमानिया पुन्हा एकदा आक्रमक; सीडीआरचा धमाका,चाकणकरांसह बड्या नेत्यांचे धाबे दणाणले