राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या पत्रामुळे पार्थ पवार यांची राज्यसभा खासदारकी अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडून 10 मार्च रोजी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिण्यात आले होते. या पत्रामध्ये सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला 28 जानेवारी ते 10 मार्चदरम्यान पक्षाकडून झालेला पत्रव्यवहार ग्राह्य धरू नका, असा उल्लेख करण्यात आला होता. या पत्रामुळे 16 फेब्रुवारी रोजी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी आयोगाला पाठवलेले पत्र रद्द होत होते. यामुळे पार्थ पवार यांच्या राज्यसभा खासदारकीसाठी करण्यात आलेला पत्रव्यवहार आणि देण्यात आलेली कागदपत्रे बाद ठरण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपद, प्रफुल पटेल यांची राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदाची निवड करण्यात आल्याबाबतचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे मिनिटस देखील आयोगाला पाठवण्यात आले होते. पटेल - तटकरे यांनी आयोगाला पाठवलेल्या पत्रानुसारच पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी तसेच त्यांच्या एबी फॉर्मवरील सह्या करण्यात आल्या. हे पत्र जर ग्राह्य धरले नाही तर या सर्व प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होऊ शकतात. ही बाब काही नेत्यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर आता सुनेत्रा पवार 10 मार्च रोजीचे पत्र निरस्त करण्याची विनंती आयोगाला करणार असल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा : Sunetra Pawar : जयची प्रमुखपदी नियुक्ती, तटकरे-पटेल यांची दिल्लीत भेट, तर दौऱ्यानंतर पहिला फोन उद्धव ठाकरेंना; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या राजकीय हालचालींना वेग