मुंबई: मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच पेटलं असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सोशल मीडियावर थेट आव्हान देणाऱ्या उद्योजक सुशील केडिया यांच्यावर संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी थेट कारवाई केली. केडिया यांचे मुंबईतील ऑफिस मनसैनिकांनी फोडले असून, कार्यालयावर दगडफेक आणि नारळ फेकून नुकसान केलं आहे. पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करत काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
सुशील केडिया हे केडियानोमिक्स या प्लॅटफॉर्मचे संस्थापक असून, त्यांनी ट्विटरवरून एक वादग्रस्त पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी, 'मी मराठी शिकणार नाही, तुम्हाला जे करायचं ते करा,' अशा शब्दांत थेट राज ठाकरे यांना उद्देशून आव्हान दिलं होतं. यामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला. विशेषतः मुंबईसारख्या मराठीभावनेला महत्त्व असलेल्या शहरात अशा प्रकारची वक्तव्यं तणाव निर्माण करणारी ठरू शकतात.
हेही वाचा: Raj-Uddhav Thackeray Victory Rally: ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर; विजयी मेळावा की नवीन राजकीय युतीचा श्रीगणेशा?
या ट्वीटनंतर केडियांनी आणखी एक भडक विधान केलं, ज्यामध्ये त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना ‘गुंड’ संबोधून धमकीच दिली होती की, 'तुमचे दोन-तीन गुंड फटके मारतील, पण आम्ही आमच्या औकातीवर आलो तर परिणाम गंभीर होतील.' यामुळे परिस्थिती अजूनच तापली आणि आज सकाळी त्यांच्या कार्यालयावर मनसे कार्यकर्त्यांनी अचानक हल्ला केला.
हेही वाचा: मराठी अस्मितेसाठी ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. या संपूर्ण प्रकारामुळे मराठी भाषा आणि अस्मितेच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं असून, या प्रकरणावर राज ठाकरे किंवा सुशील केडिया यांची अधिकृत प्रतिक्रिया येणे अद्याप बाकी आहे.