दीपक चव्हाण. प्रतिनिधी. सांगली: जागतिक योगदिनानिमित्त 21 जून रोजी जगभरात योग दिन साजरा केला जातो. अशातच, पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीत साजरा करण्यात आलेला योग दिन वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद दबाव तंत्र वापरून वर्ल्ड रेकॉर्डसाठी योग दिन साजरा करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे.
जिल्हा परिषदेकडून जागतिक योग दिन साजरा करण्यासाठी प्रत्येक शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला मॅट आणि पांढरा सलवार-कुर्ता तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना विशेषतः जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना सलवार-कुर्ता, महिला कर्मचाऱ्यांना पांढरी साडी सक्तीची करण्यात आली होती. त्यामुळे, 'हा वर्ल्ड रेकॉर्ड बोगस असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आला असून जिल्हा परिषदेच्या वर्ल्ड रेकॉर्ड योगाची चौकशी करण्याची मागणी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे करण्यात येणार आहे', अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली आहे.
जयकुमार गोरे म्हणाले:
'प्रत्येक गोष्टीकडे आपण पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून पाहायला हवा. या कार्यक्रमात मी राज्याचा मंत्री आणि नागरिक म्हणून सहभागी झालो आहे. त्यांना जो अवॉर्ड देण्यात आला आहे, त्याचे निकष ती कंपनी बघेल', असं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
तृप्ती धोडमिसेंची प्रतिक्रिया:
'अशी कोणतीही घटना घडली नाही आणि शाळेला कोणतीही सूचना पाठवण्यात आली नाही', असे सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.