तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली असून, सुरुवातीच्या कलानं संपूर्ण देशाला चकित केले आहे. दक्षिण भारताच्या या महत्त्वाच्या राज्यात यंदा मोठा राजकीय उलटफेर होताना दिसत आहे. तमिळ चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार विजय यांच्या 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) या पक्षाने सुरुवातीच्या फेऱ्यांमध्येच मोठी आघाडी घेत प्रस्थापित पक्षांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. ताज्या माहितीनुसार, विजयचा 'टीव्हीके' पक्ष 104 जागांवर आघाडीवर असून, तामिळनाडूच्या राजकारणात 'थळपती'चा करिश्मा चालल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
सत्तेची समीकरणं आणि राजकीय पेच
तामिळनाडूच्या राजकीय आखाड्यात अनेक दशकांपासून डीएमके (DMK) आणि एआयएडीएमके (AIADMK) या दोन द्रविडी पक्षांचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, यंदा अभिनेता विजयच्या पक्षाने या वर्चस्वाला सुरुंग लावला आहे. ताज्या कलानुसार, 'टीव्हीके' 74 जागांच्या टप्प्यावरून आता 104 पर्यंत पोहोचली आहे, तर सत्ताधारी डीएमके (DMK) गठबंधन 55 जागांवर आणि एआयएडीएमके (AIADMK) गठबंधन 68 जागांवर आघाडीवर आहे. सुरुवातीच्या आकड्यांमध्ये डीएमकेला 38 आणि एआयएडीएमकेला 13 जागांवर आघाडी मिळाली होती, मात्र मतमोजणी पुढे सरकली तशी विजयच्या पक्षाने मोठी झेप घेतली आहे.
हेही वाचा: Baramati Rahuri Bypolls Election Results: अजितदादा गेले पण जादू कायम, बारामतीकरांचा सुनेत्रा वहिनींना 'फुल्ल सपोर्ट', चौथ्या फेरीनंतर सुनेत्रा पवार 36 हजार 591 मतांनी आघाडीवर
ज्योतिष्यांची भविष्यवाणी आणि विजयचा उत्साह
निकालाचे चित्र स्पष्ट होण्यापूर्वीच, अभिनेता विजयच्या नीलंकराई येथील निवासस्थानी समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे, मतमोजणी सुरू असतानाच प्रसिद्ध ज्योतिषी राधान पंडित हे फुलांचा गुलदस्ता घेऊन विजयच्या घरी पोहोचले, ज्यामुळे राजकीय चर्चेला अधिक उधाण आले आहे. विजयच्या घराबाहेर उत्साहाचे वातावरण असून, जर हे कल अधिकृत निकालात रूपांतरित झाले, तर तामिळनाडूच्या राजकारणात एक नवा इतिहास लिहिला जाईल, यात शंका नाही.
डीएमकेची वादग्रस्त पोस्ट आणि राजकीय रणधुमाळी
मतमोजणीच्या धामधुमीतच डीएमकेच्या आयटी विंगने केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. "आम्ही द्रविडवादाचे वारसदार आहोत, जे आर्यवादाला मुळासकट उपटून टाकण्यासाठी आले आहोत," अशा आशयाची पोस्ट डीएमकेने केली आहे. या विधानावरून राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, निकालाच्या दिवशी अशा प्रकारच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणामुळे तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सुरक्षेचा कडा पहारा आणि निकालाची प्रतीक्षा
तामिळनाडूतील सर्व मतमोजणी केंद्रांवर प्रशासनाकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. चेन्नईच्या लोयोला कॉलेज मतमोजणी केंद्रावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. आता सर्वांचे लक्ष पुढील फेऱ्यांकडे लागले असून, तामिळनाडूची जनता सत्तेची चावी पुन्हा एकदा प्रस्थापितांकडे सोपवते की सुपरस्टार विजयच्या रूपात नवा नेता निवडते, हे काही तासांतच स्पष्ट होईल.
हेही वाचा: West Bengal Election 2026: बंगालमध्ये 'कमळ' फुलणार? सुरुवातीच्या कलानं वाढवलं ममतादीदींचं टेंशन, भाजपची बहुमताकडे वेगाने घोडदौड