Tamil Nadu Election 2026: ‘आधी 118 आमदारांची पत्रं आणा, मगच शपथविधी’; तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांचा विजय यांना सज्जड दम; घोडेबाजाराच्या भीतीने निर्णय लांबणीवर?

राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी 118 आमदारांच्या प्रत्यक्ष पाठिंब्याशिवाय शपथविधी देण्यास नकार दिल्याने विजय यांचा 'राजतिलक' लांबणीवर पडला असून राज्यात मोठा घटनात्मक पेच निर्माण झाला आहे.

Tamil Nadu Election 2026: ‘आधी 118 आमदारांची पत्रं आणा, मगच शपथविधी’; तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांचा विजय यांना सज्जड दम; घोडेबाजाराच्या भीतीने निर्णय लांबणीवर?

तमिळनाडूच्या रुपेरी पडद्यावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी लीलया साध्य करणाऱ्या थलपती विजय यांचा राजकीय प्रवास सत्तेच्या उंबरठ्यावर येऊन थबकला आहे. विधानसभा निवडणुकीत विजय यांच्या 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) या पक्षाने 108 जागांवर मुसंडी मारत दणदणीत यश मिळवले खरे, मात्र सत्तेच्या सिंहासनापर्यंत पोहोचण्याचा मार्ग अद्याप धूसर दिसत आहे. 'हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे' अशी अवस्था सध्या विजय यांची झाली असून, राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी घेतलेल्या आक्रमक आणि पारदर्शक भूमिकेमुळे राज्यातील सत्तास्थापनेचा पेच अधिकच गडद झाला आहे. सर्वात मोठा पक्ष असल्याच्या नात्याने सत्तास्थापनेचे आमंत्रण मिळेल, या अपेक्षेने राजभवनावर पोहोचलेल्या थलपती विजय यांना राज्यपालांनी "आधी 118 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र द्या, मगच बोला" असे सांगत रिकाम्या हाताने परत पाठवले आहे.

तमिळनाडू विधानसभेच्या 234 जागांच्या गणितात बहुमतासाठी 118 हा आकडा गाठणे अनिवार्य आहे. विजय यांच्या पक्षाचे 108 उमेदवार निवडून आले असले, तरी खुद्द विजय यांनी दोन मतदारसंघांतून बाजी मारल्याने तांत्रिकदृष्ट्या त्यांचे आमदार 107 च भरतात. काँग्रेसच्या 5 आमदारांनी साथ दिल्यानंतरही हे संख्याबळ 112 पर्यंतच पोहोचते. म्हणजेच, विजयाचा 'गुलाल' उधळण्यासाठी अद्याप 6 आमदारांची मोठी तफावत आहे. सामान्यतः सर्वात मोठ्या पक्षाला सत्तास्थापनेची संधी देऊन नंतर बहुमत सिद्ध करायला वेळ दिला जातो, मात्र राज्यपाल अर्लेकर यांनी "घोडेबाजार आणि अस्थिर सरकारला थारा देणार नाही" असे म्हणत विजय यांच्या रणनीतीला ब्रेक लावला आहे.

राज्यपालांनी या प्रकरणी अत्यंत कडक आणि संविधानिक पवित्रा घेतला आहे. "मी कोणालाही सत्तास्थापनेपासून अडवत नाही, मी फक्त लोकशाहीच्या मूल्यांचे रक्षण करत आहे," अशा सडेतोड शब्दांत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. राज्यपालांच्या मते, कोणत्याही पक्षाच्या केवळ 'हेडकाऊंट'शी (निवडून आलेल्या आमदारांची संख्या मोजणे) त्यांना देणेघेणे नाही, तर त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत असणे आवश्यक आहे. जर विजय यांच्याकडे 118 आमदार नसतील आणि तरीही त्यांना शपथ दिली, तर उर्वरित 6 आमदारांची जुळवाजुळव करण्यासाठी 'घोडेबाजार' होईल, अशी भीती राज्यपालांनी व्यक्त केली असून तशी अनैतिक परवानगी देण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे.

हेही वाचा: Ganja Farming: धक्कादायक! मुंबईत पालिकेच्या जमिनीवर चक्क गांजाची शेती; नगरसेविकेच्या सतर्कतेमुळे फुटलं बिंग 

तमिळनाडूच्या राजकारणात या पेचामुळे आता अनपेक्षित समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. राज्यपाल अर्लेकर यांनी थेट इशारा दिला आहे की, जर 'द्रमुक' (DMK) आणि 'अण्णाद्रमुक' (AIADMK) या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांनी एकत्र येऊन बहुमत सिद्ध केले, तर त्यांनाही सत्तास्थापनेची संधी दिली जाईल. सत्तेसाठी कोणीही आले नाही, तरी राजभवनाचे दरवाजे उघडे आहेत, पण फक्त बहुमताच्या पुराव्यासह! सोमवारपर्यंत जर कोणत्याही पक्षाला 118 चा आकडा गाठता आला नाही, तर इतर कायदेशीर पर्यायांचा आणि तज्ञांच्या सल्ल्याचा विचार केला जाईल, असेही राज्यपालांनी स्पष्ट केले आहे.

विजयाची खात्री असतानाही केवळ 6 आमदारांच्या अभावामुळे थलपती विजय यांचा 'राजतिलक' लांबणीवर पडला आहे. "वेळ लागला तरी चालेल, पण सरकार स्थिर हवे" या राज्यपालांच्या अट्टहासामुळे टीव्हीके पक्षासमोर आता इतर लहान पक्ष किंवा अपक्ष आमदारांची मनधरणी करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. जर येत्या दोन-तीन दिवसांत ही कसरत साध्य झाली नाही, तर तमिळनाडूत 'सत्तेचा सस्पेन्स' अधिक वाढून राज्यात घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुपरस्टार विजय यांचा हा राजकीय प्रवास आता एका अत्यंत निर्णायक आणि आव्हानात्मक वळणावर येऊन थांबला आहे.

हेही वाचा: Indian Railways: भारतीय रेल्वेचा कायापालट! 40 वर्षांची जुनी यंत्रणा बदलणार; आता 'AI' द्वारे तिकीटाची नवी कार्यप्रणाली

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number