राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'लाडकी बहीण योजनेचा' लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले होते. या प्रक्रियेसाठी राज्य सरकारकडून 18 नोव्हेंबर 2025 पर्यंतची वेळ देण्यात आली होती. उद्या 18 तारिख असून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी केवायसी करण्यासाठी अखेरची मुदत उरली आहे.
जर पात्र महिलांनी ठरवलेल्या मुदतीत केवायसी केली नाही, तर त्यांच्या खात्यात जमा होणारा मासिक हप्ता थांबू शकतो. केवायसी न करणाऱ्या लाभार्थ्यांचा पुढील दीड हजार रुपयांचा हप्ता थांबवण्यात येईल, अशी स्पष्ट सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे उद्यापर्यंत काहीही करून पात्र महिलांना केवायसी करण बंधनकारक ठरणार आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'लाडकी बहीण योजना' ही महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी सुरू करण्यात आली होती.
ज्या महिलांचे पति, वडील हयात नसतील किंवा त्यांची जबाबदारी घेणार कोणी नसेल अशा महिलांसाठी राज्य सरकारने गरजू महिलासांठी ही योजना सुरु केली. राज्य सरकारकडून या योजनेमार्फत दरमहा 1500 रुपये पात्र महिलांच्या बैंक खात्यात जमा केले जातात. राज्यभरात लाखो महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, अनेक अपात्र महिलांनी ज्यांच्याकडे स्थिर उत्पन्न आहे किंवा ज्यांच्या कुटुंबात सरकारी सेवक आहेत. त्यांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळले आहे. त्यामुळे सरकारने पात्र लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे.
ई-केवायसी प्रक्रिया कशी कराल?
ई-केवायसी प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला संबंधित सरकारी योजना किंवा सेवेच्या अधिकृत वेबसाइट अथवा ॲपवर जावे लागेल. यानंतर ई-केवायसी पर्याय निवडून त्यावर आधार क्रमांक टाकावा. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर तुम्हाला ओटीपी येईल, त्या ओटीपीची पडताळणी करा. अखेर 'सबमिट' करा.