Eknath Khadse: ‘अजून बाजारात भाव फुटायचेत…’; विधान परिषद निवडणुकीवरून एकनाथ खडसेंचा महायुतीला सणसणीत टोला

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी महायुतीतील धुसफुशीवर भाष्य करत निवडणुकीत आमदारांच्या खरेदी-विक्रीचा बाजार सुरू असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Eknath Khadse: ‘अजून बाजारात भाव फुटायचेत…’; विधान परिषद निवडणुकीवरून एकनाथ खडसेंचा महायुतीला सणसणीत टोला

Eknath Khadse: राज्याच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला असून महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी महायुतीतील धुसफुशीवर भाष्य करत निवडणुकीत आमदारांच्या खरेदी-विक्रीचा बाजार सुरू असल्याचा गंभीर आरोप केला आहे. सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असला तरी अद्याप या बाजाराचा निश्चित ‘भाव’ ठरलेला नसल्याची उपरोधिक टिप्पणी त्यांनी केली.

महाजनांच्या ‘संकटमोचक’ भूमिकेवर सवाल

महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास भाजप नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केला होता. यावर प्रतिक्रिया देताना खडसे यांनी महाजन यांच्यावर टीकेची झोड उठवली. पक्षाचे संकटमोचक म्हणून ओळख निर्माण केलेल्या महाजनांना जळगाव आणि नाशिकमधील बंडखोरी रोखण्यात अपयश आल्याचा दावा त्यांनी केला. आपल्या प्रभावक्षेत्रातील नाराज नेत्यांची समजूत काढण्यातही ते यशस्वी ठरले नसल्याचे खडसे यांनी म्हटले.

जळगावच्या जागेवरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर

जळगाव विधान परिषद मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीतील अंतर्गत संघर्ष उघड झाल्याचे चित्र दिसत आहे. खडसे यांच्या मते, शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील हे ही जागा आपल्या मुलासाठी मिळावी यासाठी आग्रही होते. मात्र भाजपने शिवसेनेचा दावा नाकारत उमेदवारी नंदू महाजन यांना दिली. या निर्णयामुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी निर्माण झाली असून आमदार किशोर पाटील यांनीही बंडखोरीचा फटका बसल्याचे जाहीरपणे मान्य केल्याने महायुतीतील मतभेद अधिक स्पष्ट झाल्याचे खडसे यांनी सांगितले.

निवडणुकीत पैशांच्या प्रभावाचा आरोप

विधान परिषद निवडणुकीच्या प्रक्रियेवरही खडसे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ही निवडणूक आता आमदारांच्या खरेदी-विक्रीचा बाजार बनली असून सर्वाधिक बोली लावणाऱ्याला मतदान मिळते, अशी टीका त्यांनी केली. या निवडणुकीत आर्थिक ताकदीचा प्रभाव वाढल्याचा आरोप करत त्यांनी निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत चिंता व्यक्त केली.

हेही वाचा – Bacchu Kadu : "मंत्री चुकला तर ठोकल्याशिवाय राहू नका…" बच्चू कडू यांचा शिवसैनिकांना सल्ला

रेशमा काळेंच्या भूमिकेकडे लक्ष

दरम्यान, जळगावमधून रेश्मा काळे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली असल्याने त्यांच्या पुढील भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत भाजपचे उमेदवार नंदू महाजन यांची स्थिती मजबूत असल्याचे मतही खडसे यांनी व्यक्त केले. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत नाराजी आणि विरोधकांचे आरोप यामुळे राज्यातील राजकारण अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number