मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे आणि ते म्हणजे 30 जूनपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. हे अधिवेशन 30 जूनपासून 18 जुलैपर्यंत असेल. शुक्रवारी या अधिवेशनाची तयारी आणि नियोजनासाठी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी माहिती दिली की, 'विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली'. एकीकडे सत्ताधारी पक्षाकडून पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान कार्यक्रम होणार आहे तर दुसरीकडे विरोधकांची पत्रकार परिषद पार पडणार आहे.
सूत्रांनुसार, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील विविध प्रश्नांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात विविध प्रश्नांवरून रंगत असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक प्रश्नावरून वाद-संवाद रंगताना पाहायला मिळत आहे. यावरून विरोधक सतत सरकारला जाब विचारात आहेत. त्यासोबतच सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहेत.
हेही वाचा: पवार कुटुंबात आनंदाची बातमी; युगेंद्र पवारांचा झाला साखरपुडा
'या' विषयांवरून तापणार राजकीय वातावरण?
विधिमंडळ अधिवेशनात विरोधक अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी पक्षाला घेराव घालण्याची तयारी करत आहेत. यामध्ये मुख्य प्रश्न हा आहे की, 'निवडणूक सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था, अकरावी प्रवेश प्रक्रिया घोळ, हिंदी भाषा सक्ती, महिला अत्याचार, अवकाळीतील शेतकऱ्यांची नुकसान भरपाई, मुंबईतील रेल्वे अपघात, पावसामुळे मुंबईची झालेली तुंबई, रस्ते, खड्डे, जुने पूल, गुन्हेगारी यासारख्या असंख्य मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होऊन सरकारला घेरण्याचा तयारीत आहेत. त्यामुळे, विधानसभा निवडणूक मतदार यादी हेराफेरी हा मुद्दा देखील गाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे.