Trupti Desai on Ashok Kharat Case Nashik : नाशिकमधील स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात याला पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणात लैंगिक शोषण, अघोरी पूजा आणि आर्थिक फसवणुकीचे गंभीर आरोप खरातवर आहेत. त्याच्या काळ्या कर्तृत्वाचा पर्दाफाश झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी या प्रकरणाची धक्कादायक ‘इनसाईड स्टोरी’ उघड केली आहे. देसाई यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा कसा केला, याची सविस्तर माहिती दिली.
5 मार्चला समोर आले अश्लील व्हिडिओ आणि पेनड्राईव्ह
तृप्ती देसाई यांनी सांगितले की, 5 मार्च 2026 रोजी रात्री उशिरा त्यांच्याकडे एक पेनड्राईव्ह आला, ज्यामध्ये अशोक खरातने केलेल्या महिलांच्या लैंगिक शोषणाचे अत्यंत अश्लील आणि गंभीर व्हिडिओ होते. खरात हा 12 मार्च 2026 रोजी ऑस्ट्रेलियाला पळून जाण्याच्या तयारीत होता. जर तातडीने कारवाई केली नसती, तर तो देशाबाहेर निसटला असता. त्यामुळे तृप्ती देसाई आणि त्यांच्या टीमने गुप्तपणे काम करत 6 मार्च 2026 रोजी सकाळी अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांकडे (SP) हे प्रकरण सोपवले. त्यानंतर हे प्रकरण मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांपर्यंत पोहोचवण्यात आले, ज्यानंतर नाशिक पोलिसांनी कारवाईचे आदेश दिले.
अंधश्रद्धेचा बाजार आणि रिमोटचा ‘प्लास्टिक नाग’
ईशान्येश्वर मंदिरात खरात कशा प्रकारे लोकांना फसवयचा, याचेही धक्कादायक खुलासे झाले आहेत. नाशिकच्या मार्केटमधून 15 ते 20 फूट लांबीचा प्लास्टिकचा नाग आणून, त्यात रिमोट बसवून तो जिवंत असल्याचा भास खरात निर्माण करायचा. “नाग माझे कसे ऐकतो,” असे दाखवून तो भाविकांच्या अंधश्रद्धेचा फायदा घ्यायचा. इतकेच नाही तर, मंदिरातील पिंडीजवळ आणि गाभाऱ्यातील गुप्त खोल्यांमध्ये महिलांना बोलावून त्यांचे लैंगिक शोषण केले जात असे. या अघोरी प्रकारांमुळे गावकरी आणि भाविकांमध्ये आता संतापाची लाट आहे.
3 हजार किलोचे खडे 21 कोटींना विकले
खरातच्या आर्थिक फसवणुकीचे स्वरूपही प्रचंड मोठे आहे. तो बाजारातून केवळ 3,000 रुपये किलो दराने साधे खडे आणायचा आणि मंत्रांनी सिद्ध केल्याचे सांगून एक-एक खडा 3 लाख रुपयांना विकायचा. अशा प्रकारे एका किलोच्या खड्यातून तो सुमारे 21 कोटी रुपये कमवत असे. त्याने अवाढव्य फार्महाऊसही उभारले आहे. याशिवाय जमिनी बळकावणे, काही लोकांना गायब करणे अशा बेकायदेशीर कामातही त्याचा हात असल्याचा आरोप तृप्ती देसाई यांनी केला आहे. काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि राजकीय नेते त्याला ‘गुरु’ मानत असल्याने यापूर्वी हे प्रकरण दाबले गेल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
‘मकोका’ आणि फाशीच्या शिक्षेची मागणी
तृप्ती देसाई यांनी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांची भेट घेऊन खरातच्या संपूर्ण टोळीवर मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणातील पीडित महिलांनी न घाबरता पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. खरातला फाशीची शिक्षा व्हावी आणि त्याने बांधलेले ईशान्येश्वर मंदिर शासनाने गावकऱ्यांच्या ताब्यात द्यावे, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणाऱ्या अशा प्रवृत्तींना कायद्याचा धाक बसवणे आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.