मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अखेर एकत्र येण्याची अधिकृत घोषणा केली आहे. या ऐतिहासिक युतीमुळे मराठी राजकारणात नवा अध्याय सुरू झाल्याचं मानलं जात आहे.
युतीची घोषणा करताना उद्धव ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा ठळकपणे मांडला. “आमचं एकमत झालं आहे आणि म्हणूनच आम्ही एकत्र आलो आहोत,” असं सांगत त्यांनी ही युती केवळ निवडणुकीपुरती नसल्याचं स्पष्ट केलं. संजय राऊत यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देत, मराठी माणसाने संघर्षातून मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिल्याचं अधोरेखित केलं.
उद्धव ठाकरे म्हणाले की, ठाकरे कुटुंबाने मुंबई आणि महाराष्ट्रासाठी सातत्याने कष्ट घेतले. मुंबई महाराष्ट्रात आल्यानंतर काही परप्रांतीय शक्तींनी मराठी माणसाच्या जीवावर राजकारण केलं, त्यातूनच शिवसेनेचा जन्म झाला. आज दिल्लीमध्ये बसून राज्याच्या कारभारात हस्तक्षेप करणाऱ्या मानसिकतेमुळे महाराष्ट्राची अवस्था बिकट झाली आहे, असा आरोपही त्यांनी केला.
“मराठी माणसाला कोणीही त्रास देणार असेल तर त्याला राजकारणात टिकू दिलं जाणार नाही,” असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला. मराठी समाजाला उद्देशून ते म्हणाले, “आता जर चुकलो तर संपलो. फुटू नका, तुटू नका, मराठीपणाचा वसा सोडू नका.” मराठी माणूस कुणाच्या वाटेला जात नाही, पण कोणी त्याच्या वाटेला गेलं तर तो लवकर सोडत नाही, असं ठाम विधानही त्यांनी केलं.
यानंतर राज ठाकरे यांनीही स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. “मुंबईचा महापौर मराठीच असेल आणि तो आमचाच असेल,” असं ठामपणे सांगत त्यांनी आगामी निवडणुकीचा सूर स्पष्ट केला. सोशल मीडियावर फिरणाऱ्या काही कथित व्हिडिओंबाबत बोलताना, “माझ्याकडे अनेक गोष्टी असतात, पण आज त्यावर बोलायचं नाही. आज फक्त युतीची घोषणा करण्याचा दिवस आहे,” असं म्हणत त्यांनी विषय टाळला.
ठाकरे बंधूंच्या या युतीमुळे मुंबई महानगरपालिका निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची लढाई न राहता मराठी अस्मिता आणि महाराष्ट्राच्या राजकारणासाठी निर्णायक ठरण्याची चिन्हं दिसत आहेत.