Uddhav Thackeray Matoshree Urgent Meeting: ठाण्यातील राजकीय वातावरणात एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना घडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाण्यातील विभाग प्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांना त्यांच्याच कार्यालयात घुसून गोळ्या झाडून संपवण्यात आलं. या अचानक झालेल्या प्राणघातक हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. राजकीय वर्चस्व आणि स्थानिक प्रकल्पांमधील आर्थिक व्यवहारांच्या वादातून हा गुन्हा झाला असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून संपूर्ण ठाण्यात कमालीचे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कुटुंबाचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
पूर्णेकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संतप्त कुटुंबीयांनी आरोपींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. यामुळे परिस्थिती अधिकच संवेदनशील बनली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीने तपासचक्र हलवून एका आरोपीला बेड्या ठोकल्या असून, या कटात सहभागी असलेल्या इतर संशयितांचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.
उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये
ठाण्यातील या भीषण हत्याकांडानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अत्यंत आक्रमक मोडमध्ये आले आहेत. त्यांनी मुंबईतील ‘मातोश्री’ या आपल्या निवासस्थानी पक्षाच्या सर्व विभाग प्रमुखांची आपत्कालीन बैठक बोलावली आहे. या बैठकीत ठाण्यातील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला जाणार आहे. दुसरीकडे, आमदार आदित्य ठाकरे हे आज संध्याकाळी 5 वाजता ठाण्यात जाऊन दिवंगत बाळू पूर्णेकर यांच्या शोकाकुल कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.