Elections 2026: सध्या राज्यात महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आज पाच अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. 'मातोश्री'चे दरवाजे, मुख्यमंत्र्यांची नार्को टेस्ट आणि राष्ट्रवादीच्या 'दादा-ताईं'ची जवळीक अशा विषयांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दिवसभरातील 5 मोठ्या घडामोडी खालीलप्रमाणे:
फडणवीसांसाठी 'मातोश्री'चे दरवाजे उघडणार? उद्धव ठाकरेंचे स्पष्टीकरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मातोश्रीचे दरवाजे माझ्यासाठी बंद झाले,' असे विधान केले होते. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'मी माणुसकी विसरणारा माणूस नाही. मात्र, तुम्ही मातोश्रीवर वाट्टेल ते आरोप करून तिला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहात. आधी ते आरोप करण्याचे तोंड बंद करा, मगच मातोश्रीचे दरवाजे उघडतील.'
'मुख्यमंत्र्यांची नार्को टेस्ट करा'; काँग्रेसची आक्रमक मागणी
राज्यातील कायदा-सुव्यवस्था, फोन टॅपिंग आणि वाढती गुन्हेगारी याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. राज्यातील तेढ आणि गोंधळाचे मूळ शोधण्यासाठी मुख्यमंत्र्यांची 'नार्को टेस्ट' करावी, अशी खळबळजनक मागणी त्यांनी पुण्यात केली.
'दादा-ताई' पुन्हा एकत्र! पुण्यात अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर
दरम्यान, पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने सर्वांच्या भुवया उंचावणारी घटना घडली. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे नेते, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकत्र येत पुण्याचे घोषणापत्र जाहीर केले. भविष्यातील युतीबाबत विचारले असता, सुप्रिया सुळेंनी 'तुम्हाला हवा तो अर्थ काढा,' असे म्हटले, तर अजित पवारांनी 'थांबा आणि पाहा, असे सांगत गूढ कायम ठेवले.
हेही वाचा – Gunratna Sadavarte: ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल; पत्रकार परिषदेत एकामागून एक गंभीर आरोप
'अक्षय शिंदेचा खूनच झाला'; रोहित पवारांचा भाजपवर निशाणा
तथापी, बदलापूर प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटेला भाजपने स्वीकृत नगरसेवक केल्याने रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला. अशा विकृत प्रवृत्तीच्या नेत्याला वाचवण्यासाठीच अक्षय शिंदेचा एन्काउंटरच्या नावाखाली खून करण्यात आला का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
'पिंपरी-चिंचवडचे कारभारी बदला'; एकनाथ शिंदेंचे आवाहन
याशिवाय, पिंपरी-चिंचवडमधील भ्रष्टाचार आणि लाचलुचपत प्रकरणांवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यमान सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. शहरात कोयता गँगचा हैदोस आणि निविदांमधील घोटाळे रोखायचे असतील, तर शहराचे कारभारी बदलण्याची वेळ आली आहे, असे आवाहन त्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे मतदारांना केले.