मुंबई : देशात लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका अर्थात वन नेशन वन इलेक्शन घेण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. हे विधेयक हिवाळी अधिवेशनात पुढील आठवड्यात सभागृहात मांडले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळी होणार आहेत. वन नेशन वन इलेक्शनचा विचार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 14 मार्च रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आपला अहवाल सादर केला होता. त्या अहवालाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
काय आहे एक देश एक निवडणूक विधेयक?
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालात एक देश एक निवडणूक म्हणजे संपूर्ण देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होणार असल्याच्य प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. अहवालात 2029 मध्ये एकाचवेळी निवडणुका घेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सर्व राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत म्हणजेच 2029 पर्यंत वाढवण्यात येणार आहे. लोकसभा आणि विधानसभांचे सदस्य निवडण्यासाठी एकाच दिवशी, एकाच वेळी किंवा टप्प्याटप्प्याने मतदान होणार असल्याची माहिती आहे. एकाचवेळी निवडणुका घेण्यासाठी उपकरणे, मनुष्यबळाचे आगाऊ नियोजन करण्याची शिफारस देखील करण्यात येणार आहे. कायदा आयोगाच्या प्रस्तावाला सर्व पक्षांनी सहमती दर्शवल्यास 2029 पासूनच त्याची अंमलबजावणी होणार आहे. स्वातंत्र्यानंतर 1952, 1957, 1962 आणि 1967 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी झाल्या होत्या.