बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीसह महायुतीचे प्रयत्न सुरू होते. बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होईल. त्यानंतर 4 मे रोजी बारामतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. तसेच आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. अजित पवारांच्या निधनानंतर महायुतीकडून सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्राध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या विरुद्ध काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी दिल्याने ही लढत चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मात्र ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी हर्षवर्धन सपकाळ यांना सत्ताधाऱ्यांकडून फोनवर फोन केले जात आहेत. यावर आता विजय वडेट्टीवार यांनी महत्त्वाची माहिती माध्यमांना दिली आहे. आज दुपारी काँग्रेस आपला अर्ज परत घेणार असल्याची माहिती आहे. काँग्रेस उमेदवार बारामती विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून आज दुपारपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेईल. प्रदेशाध्यक्ष सर्व नेत्यांची भावना केंद्रीय श्रेष्ठींना कळवतील, त्यांच्या परवानगी दुपारपर्यंत अर्ज मागे घेण्याचा निर्णय होईल अशी शक्यता आहे. अशी शक्यता विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केली आहे.
यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले की, “कालच आम्ही सगळ्या नेत्यांनी चर्चा केली, आम्ही निर्णय घेतला आहे की बारामतीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा, प्रदेशाध्यक्ष बरोबर चर्चा होईल, प्रदेशाध्यक्ष आणि बंटी पाटील यांचाही मत आहे आता हा निर्णय दिल्लीच्या हाय कमांडशी टाकावा लागेल आणि त्यांचा आदेश आल्यानंतर तो फॉर्म मागे घेण्याचा निर्णय होईल. प्रदेशाध्यक्षांना अनेकांचे फोन आले, पुण्यात सुनेत्रा पवार यांचाही प्रदेशाध्यक्षांना फोन होता, या निवडणुकीत पुढे जाणार आहेत थांबवावं अशी भूमिका आणि भावना दिसले त्यामुळे आमच्या नेत्यांचे एकमत झाला आहे. आज प्रदेशाध्यक्ष बोलणार आहेत, पक्षश्रेष्ठी कानावर टाकूनच हा निर्णय घ्यावा. एखाद्या विद्यमान एमपी किंवा आमदाराचे कुटुंबाकडे बघतो त्यामुळे निवडणुका बिनविरोध व्हाव्या असा प्रयत्न असतो”.
“जर प्रथा पारंपरा कोणीच पाळत नसतील, एकमेकांना घेऊन दुखात मानव माणुसकीची भावना असते, पण ते होताना दिसलं नाही म्हणून आम्ही फॉर्म भरला होता. अजित दादा एक नेता म्हणून असलेलं जे प्रेम आहे नेता मधून त्यांना लोकात एक स्थान होतं अशा कुटुंबातील उमेदवारी अर्ज हे भावना बोलून दाखवले. आम्ही तिने नेत्यांनी चर्चा करून हाय कमांडला निर्णय कळवला आहे, पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. सुनेत्रा ताई पवार यांच्या निवड बिनविरोध होण्यासाठी यांनी कोणाच कोणाला फोन केले नाही, कदाचित त्यांना माहीत असेल की आपला फोन कोणी ऐकणार नाही. सुनेत्रा ताईंनी आमचं महत्त्व कमी केलं त्यामुळे झाकली मूठ सव्वालाखाची.”
फडणवीसांचा सपकाळांना फोन
बारामती पोटनिवडणुक बिनविरोध लढवावी यासाठी सुनेत्रा पवार आणि रोहित पवार यांनी कॉंग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत चर्चा केली. यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत फोनवर चर्चा केली आहे. यावेळी सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीसाठी काँग्रेसने बारामतीतून उमेदवार मागे घ्यावा, अशी विनंती केली आहे. दरम्यान बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. अशातच बारामती पोटनिवडणुकी दरम्यान राजकीय हालचालींना वेग आला आहे.